दुबईहून आलेल्या प्रवाशांकडून स्वत:च संपर्क

नागपूर :  शहरातील विमानतळावर केवळ आंतरराष्ट्रीय म्हणजे दोहा आणि दुबई येथून येणाऱ्या विमानातील प्रवाशांचे‘थर्मल स्क्रिनिंग’ करण्यात येत आहे. पण, परदेशातून येणारे प्रवासी आधी मुंबई, दिल्ली किंवा देशातील इतर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उरतात. नंतर देशांतर्गत विमान सेवेने नागपुरात येतात. परदेशातून येणाऱ्यांची देशातील संबंधित विमानतळावर तपासणी झालेली असते. त्यामुळे पुन्हा नागपुरात अशा प्रवाशांची तपासणी केली जात नाही. मात्र, दुबईहून आलेल्या काही प्रवाशांनी नागपूर विमानतळावर तपासणी झाली नाही म्हणून विमानतळावरील संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला. त्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत त्यांची तपासणी झाली तेव्हा काही आढळले नाही. परंतु त्या विमानतळावरील इतर प्रवाशांच्या संपर्कात आल्यास करोनाची लागण होण्याची शक्यता असते. त्यामुळे सर्वच प्रवाशांची तपासणी व्हायला हवी. अन्यथा देशांतर्गत प्रवाशांच्या मार्फत करोनाचा प्रसार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

.. तर नागपुरातील करोनाग्रस्ताची योग्य काळजी घेता आली असती

नागपुरात आढळलेला करोनाग्रस्तही अमेरिकेवरून परतला होता. अमेरिकेवरून नागपूरसाठी थेट विमान नाही. त्यामुळे  तो आधी दोहा शहरात उतरून नंतर ५ मार्च रोजी नागपूरला आला. परंतु नागपूर विमानतळावर ‘थर्मल स्क्रिनिंग’ ६ मार्चपासून सुरू झाले. त्यामुळे नागपूर विमानतळावर उतरल्यावर त्याची आरोग्य तपासणी झाली नाही. ‘थर्मल स्क्रिनिंग’चा निर्णय आधी झाला असता तर नागपुरातील पहिल्या करोनाग्रस्ताबाबत वेळीच योग्य काळजी बाळगता आली असती.