एरवी वातानूकुलित कार्यालयात बसून खंडणी मागणे, वादग्रस्त भूखंडांमध्ये बंदुकीच्या धाकावर मांडवली करून घेणारा ‘डॉन’ संतोष आंबेकर हा नागपूर मध्यवर्ती कारागृहात मिळणाऱ्या जेवणाला वैतागला आहे. ही भावना तो दरवेळी विशेष मोक्का न्यायालयात सुनावणीला हजर होताना आपल्या जवळच्या व्यक्तींजवळ बोलून दाखवत आहे.
स्वप्नील सुरेश बडवई (रा. १९ गजानन धाम, सहकारनगर) याच्या घरात घुसून घर रिकामे करण्यासाठी जीवे मारण्याची धमकी देणे आणि तोडफोड केल्याप्रकरणी युवराज माथनकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी नागपूर पोलिसांनी टोळीविरुद्ध मोक्का अंतर्गत कारवाई केली. २७ जानेवारीला मोक्का लागल्याची माहिती मिळताच टोळीचा म्होरक्या संतोष आंबेकर हा फरारी झाला. त्यानंतर बुधवार २ मार्चला तो तपास अधिकारी सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर तोरे यांच्यासमक्ष हजर झाला. यानंतर आठ दिवस तो पोलीस कोठडीत होता. पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. त्याला कारागृहात एक महिना झाला आहे. या महिनाभरात त्याला दररोज कारागृहाचेच जेवण मिळते. सकाळी १० आणि संध्याकाळी ६ वाजता त्यांना जेवण देण्यात येते.
संध्याकाळी लवकर मिळते. जेवणाच्या वेळेपर्यंत ते डब्यामध्येच असते. त्यामुळे डब्यातील अन्न थंड होते आणि पोळ्याही कडक होतात. त्यामुळे कारागृहात मिळणारे अन्न खावेसे वाटत नाही, अशी आंबेकरची तक्रार असून, तो नेहमी निकटवर्तीयांजवळ बोलून दाखवतो. कारागृहात कैद्यांना मिळणाऱ्या अन्नाचा दर्जा सुधारावा, अशी भावना त्याने काहींकडे बोलून दाखविल्याचे समजते.
एमपीआयडीकडून डबा?
महाराष्ट्र कारागृह अधिनियमांतर्गत केवळ महाराट्र गुंतवणूकदार हितसंबंध संरक्षण कायद्यांतर्गत (एमपीआयडी) अटक करण्यात आलेल्या आरोपींनाच खासगी डब्याची सुविधा उपलब्ध आहे. मोक्का आणि इतर कायद्यातील गुन्हेगारांना हा खासगी डबा मिळत नाही. त्यामुळे आंबेकर हा एमपीआयडीच्या कैद्याच्या माध्यमातून खासगी डबा मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.