महापालिका प्रशासनाचा विद्यापीठाला धमकीवजा इशारा; इतर परीक्षांवर मात्र र्निबध नाहीत

लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा लांबल्याने विद्यार्थी परीक्षेची चातकासारखी वाट बघत असताना महापालिकेने मात्र करोना काळात परीक्षा घेतल्या तर पोलिसात तक्रोर दाखल करू, असा धमकीवजा इशारा दिल्याने विद्यापीठ प्रशासनाची चिंता वाढली आहे. विशेष म्हणजे, ‘इग्नू’सह अन्य स्पर्धा परीक्षांना परवानगी देणाऱ्या महापालिकेकडून विद्यापीठाला दुजाभावाची वागणूक का, असा सवाल समोर येत आहे.

शहरात करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने महापालिकेने शाळा, महाविद्यालये ७ मार्चपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या आदेशानुसार विद्यापीठाने नियमित वर्ग बंद करून पुन्हा ऑनलाईन वर्ग सुरू केले. मात्र, दीड वर्षांपासून रखडून असलेल्या बी.एड.च्या परीक्षांना सुरुवात झाली असताना महापालिकेने परीक्षा बंद करण्याचे आदेश दिले. करोना रुग्ण आढळल्यामुळे डॉ. आंबेडकर महाविद्यालय ‘सील’ करताच विद्यापीठाने तातडीने दुसऱ्या केंद्रावर परीक्षा घेण्याची तयारी दर्शवली होती. तशा सूचनाही विद्यार्थ्यांना दिल्या. मात्र, परीक्षा घेतली तर  पोलिसात तक्रोर दाखल करू, असा धमकीवजा इशारा दिल्याने विद्यापीठाने हात वर केले. उल्लेखनीय म्हणजे, याच काळात जेईईची परीक्षा शहरातील विविध केंद्रांवर घेण्यात आली.  इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाची परीक्षाही ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे. रविवारीच आरोग्य विभागाच्या ऑफलाईन परीक्षेसाठी राज्यभराच्या विविध भागातून हजारो विद्यार्थी नागपुरातील परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते. त्यामुळे या परीक्षा करोनाचे र्निबध पाळून सुरू असताना विद्यापीठाच्या परीक्षांमुळेच करोना वाढतो का, असा प्रश्न केला जात आहे.  शहरातील सर्व शासकीय कार्यालये सुरू आहेत. विविध कामांसाठी नागरिकही भेटी देत आहेत. असे असताना महापालिकेने विद्यापीठाचे परीक्षा भवन बंद करून विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याचे आदेश दिले. महापालिकेच्या या दुटप्पी भूमिकेमुळे विद्यापीठात संभ्रमाचे वातावरण आहे.

ऑनलाईन परीक्षा २० मार्चपासून

नागपूर विद्यापीठाच्या आज बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये परीक्षेसंदर्भात निर्णय घेण्यात आला. यानुसार ८ ते २० मार्चपर्यंत प्रात्यक्षिक परीक्षा होणार आहेत. २० मार्च ते ३० एप्रिल दरम्यान लेखी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. बी.ई., बी.टेक., एल.एल.बी., बी.एड., बी. फार्म. अशा पदवी व पदव्युत्तर प्रथम सत्राच्या परीक्षांच्या तारखा नंतर जाहीर करण्यात येणार आहेत. विद्यापीठाने या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या असल्या तरी करोनामुळे रखडलेल्या ऑफलाईन परीक्षांचे काय? सोबतच प्रात्यक्षिक परीक्षा ऑफलाईन होणार की ऑनलाईन, यावर अद्यापही अनिश्चितता आहे.