महेश बोकडे

क्षेत्रीय आयुर्वेदिक मातृ एवं शिशु स्वास्थ्य अनुसंधान संस्थेने (आर.ए.आर.आय.एम.सी.एच.) नागपुरातील करोना प्रतिबंधित क्षेत्रातील (हॉटस्पॉट) एक हजार व्यक्तींवर आयुर्वेदच्या दोन औषधांची वैद्यकीय चाचणी सुरू केली आहे. त्यात करोनाबाधितांच्या जवळच्या व्यक्तींचीच निवड करून त्यांची करोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे औषध दिले जात आहे.

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या या संस्थेकडून या प्रयोगासाठी नागपुरातील सर्वाधिक बाधित आढळणाऱ्या मोमीनपुरा, सतरंजीपुरा, कोष्टीपुरा, गांधीबाग, नाईक तलाव, बांगलादेशसह इतरही काही भागांचा समावेश करण्यात आला आहे.

या प्रकल्पासाठी संस्थेकडून तज्ज्ञांचा चमू स्थापन करण्यात आला असून ते प्रतिबंधित क्षेत्रातील बाधितांच्या कुटुंबीयांसह जवळच्या सुमारे १ हजार व्यक्तींची निवड करत आहेत. या सगळ्यांना सुदर्शन घनवटी (तापाशी संबंधित औषध) आणि गुडूची घनवटी (सर्दी व प्रतिकारशक्ती वाढीचे औषध) दिल्या जात आहेत.

हे औषध केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या इंडियन मेडिसिन्स फार्मासिटिकल कार्पोरेशन लिमिटेड या कंपनीकडून निर्मित आहे.

या एक हजार व्यक्तींचा या क्षेत्रातील औषधे न दिलेल्या इतर बाधितांच्या जवळच्या ५०० व्यक्तींशी तुलनात्मक अभ्यास केला जाणार आहे. या प्रकल्पात शेवटी सर्व १,५०० व्यक्तींच्या जीवनशैलीचा अभ्यास होईल.

आयुर्वेदाच्या मदतीने प्रतिकारशक्ती वाढवून करोनावरही नियंत्रण मिळवता येते. या प्रकल्पाअंतर्गत नागपुरातील बाधितांचे नातेवाईक व इतरांची निवड करून त्यांना दोन औषधे दिली जात आहेत. सहा महिने चालणाऱ्या या प्रयोगात सहभागी १,५०० जणांवर आयुर्वेदिक तज्ज्ञ लक्ष ठेवणार आहेत. या चाचणीचा भविष्यात मोठा लाभ  शक्य आहे.

– डॉ. आर. गोविंद रेड्डी, प्रभारी साहाय्यक निदेशक (वैज्ञानिक  ४),आर.ए.आर.आय.एम.सी.एच.