नागपूर, वर्धा आणि मुंबईत ‘अ‍ॅडॉन थेरपी’चा प्रयोग

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर : करोनावर ठोस औषध नसल्याने देश-विदेशातील संशोधन संस्थेत  विविध औषधांवर प्रयोग सुरू आहेत. या क्रमात आता केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रीय आयुर्वेदीय मातृ एवं शिशु स्वास्थ्य अनुसंधान संस्थेकडून (आर.ए.आर.आय.एम.सी.एच.) नागपूर, मुंबई आणि वर्धा या तिन्ही शहरातील प्रत्येकी एका वैद्यकीय महाविद्यालयात अ‍ॅलोपॅथी औषधांसह आयुर्वेदच्या आयुष-६४ या औषधाचीही वैद्यकीय चाचणी सुरू करण्यात आली आहे.

नागपूरचे मेडिकल, मुंबईचे नायर, वर्धेतील दत्ता मेघे इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायंसेस या अ‍ॅलोपॅथी शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात हा प्रयोग सुरू आहे. या प्रकल्पात नागपूरच्या मेडिकलमध्ये प्रत्येकी ३० बाधितांचे दोन गट करून एका गटाला अ‍ॅडॉन थेरपीनुसार सध्या सुरू असलेल्या अ‍ॅलोपॅथी औषधांसह आयुर्वेदिक आयुष-६४ हे औषध दिले जात आहे. नंतर या ३० बाधितांवरील परिणामाची आयुर्वेद औषध न दिलेल्या ३० बाधितांशी तुलना करून अभ्यास केला जाईल. औषधांसाठी निवडलेल्या ३० जणांत लक्षणे नसलेल्या व लक्षणे असलेल्या बाधितांचाही समावेश आहे.

बाधितांवरील हा अभ्यास सुमारे सहा महिने चालणार आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयाकडून लखनौ  येथील एका संस्थेतही अ‍ॅडॉन थेरपीची चाचणी सुरू झाली आहे. आयुष-६४ या औषधाची प्राण्यांवरही वैद्यकीय चाचणी झाली असून आता ती मानवावर केली जात आहे. या औषधाची हत्तीपाय व इतर काही आजारांच्या रुग्णांवर  चाचणी झाली असून बरेच सकारात्मक परिणाम पुढे आल्याची माहिती आर.ए.आर. आय.एम.सी.एच. संस्थेचे प्रभारी सहाय्यक निदेशक डॉ. आर. गोविंद रेड्डी यांनी दिली. मेडिकलमध्ये या चाचणीवर औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेश गोसावी लक्ष ठेवून आहेत.

‘‘हिवतापाच्या रुग्णांना हायड्रोक्सी क्लोरोक्विन या औषधांचा फायदा होत असल्याचे पुढे आले होते. आयुष-६४ हे ३० वर्षे जुने औषधही हिवतापाच्या रुग्णांसाठी उत्तम आहे. त्यामुळे नागपूर, मुंबई, वर्धेतील रुग्णांवर याची चाचणी घेतली जात आहे. त्याचे सकारात्मक परिणाम येण्याची आशा आहे.’’

– डॉ. आर. गोविंद रेड्डी,

प्रभारी सहाय्यक निदेशक (वैज्ञानिक-४), आर.ए.आर.आय.एम.सी.एच.

असे आहे ‘आयुष-६४’ 

नवी दिल्लीतील केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषदेने आयुष-६४ या औषधाचे स्वामित्व हक्क घेतले आहे. हे औषध हिवतापाच्या रुग्णांना दिले जात असून त्यात सप्तपर्णा, कटूकी, किरायतीक्ता, कुबेरक्षा हे चार घटक आहेत. पॉली हर्बल संवर्गातील या औषधात लोह धातू नसतात. हे औषध इंडियन मेडिसीन्स फार्मासिटिकल कार्पोरेशन लिमिटेड या केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या अखत्यारितील कंपनीत तयार झाले आहे.