उच्च न्यायालयाचा सवाल, हुंडय़ासाठी छळाचा गुन्हा रद्द

पत्नीसाठी विदेशातून लाखो रुपये पाठवणारा पती लग्नानंतर काही दिवसांनी सासरच्या मंडळींकडून हुंडा कसा मागणार, असा सवाल करीत उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पती व त्यांच्या नातेवाईकांवर हुंडय़ासाठी छळ केल्याचे आरोप पचनी पडत नसल्याचे मत व्यक्त केले. तसेच यासंदर्भातील गुन्हा रद्द केला.

परवेज खान हा रियाध येथे नोकरी करतो. डिसेंबर २०१२ मध्ये त्याचा विवाह हिना नावाच्या तरुणीशी झाला. लग्नानंतर काही दिवसांनी तो रियाधला निघून गेला. त्यानंतर हिनाने ९ जानेवारी २०१६ ला पती व सासरची इतर मंडळी  हुंडय़ासाठी छळ करीत असल्याची पोलिसात तक्रार दिली. त्यावेळी सदर प्रकरण पोलिसांनी ‘मध्यस्थी केंद्रा’कडे वर्ग केले. त्यानंतर तडजोड न झाल्याने १० मे २०१६ ला पुन्हा तक्रार दिली. त्या आधारावर कामठी पोलिसांनी हुंडय़ासाठी छळ करण्याचा गुन्हा दाखल केला. तो गुन्हा रद्द करण्यासाठी परवेज व इतर आठ आरोपींनी उच्च न्यायालयात अर्ज केला. लग्नानंतर परवेज रियाधमधून दर महिन्याला ४९ हजार रुपये पत्नी हिनासाठी पाठवत होता.  २०१३ ते २०१५ पर्यंत त्याने नियमित पैसे पाठवले. सासऱ्याच्या उपचारासाठीही दीड लाख रुपयेही दिले. ही रक्कम परत मागितल्याने  हिनाने पाच लाख रुपये हुंडा मागितल्याची तक्रार केली, असे परवेजने सांगितले. त्यासाठी वेस्टर्न युनियनमार्फत पाठवलेल्या लाखो रुपयांच्या पावत्याही परवेजने दाखल केल्या. या आधारावर न्या. वासंती नाईक आणि न्या. स्वप्ना जोशी यांनी हिनाचे हुंडय़ासाठी छळ केल्याचे आरोप चुकीचे ठरवले. पती विदेशातून पत्नीसाठी लाखो रुपये पाठवत असेल तर तो केवळ पाच लाख रुपयांची मागणी कशी करू शकतो, असा सवाल केला. हा आरोप पचनी पडण्यासारखा नसून हिना ही केवळ काही दिवस पतीच्या घरी राहिली आहे व इतर आरोपींचा कधीही संपर्क आलेला नसताना त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे दिसून येते, असे मत व्यक्त करून पती व इतरांविरुद्ध दाखल गुन्हा रद्द केला. पती व इतर आरोपींतर्फे अ‍ॅड. आदिल मिर्झा यांनी बाजू मांडली.