अनिल अवचट यांचा बालगोपालांना मूलमंत्र
छोटय़ा छोटय़ा गोष्टींतून आनंदोत्सव साजरा करा, असा मूलमंत्र ज्येष्ठ कवी, बासरीवादक, सामाजिक कार्यकर्ते आणि पुण्याच्या मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ. अनिल अवचट यांनी बालगोपालांना दिला.
सततची स्पर्धा आणि जगण्याच्या शर्यतीत गढून गेलेला माणूस हसायचं विसरलाय. विद्यमान सरकारने नोकऱ्यांच्या संधी आटवल्यात आणि कार्पोरेट जगात सर्व सुरक्षाच संपुष्टात आली. १२ तास काम करूनही उतरत्या वयात विम्याचे, उपदान किंवा सेवानिवृत्ती वेतनासारखे सुरक्षा कवच नाही. त्यात मुलांचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण फारच जीवघेणे होत आहे. कारण दोघांनाही कामे करावी लागतात आणि थकून भागून घरी आलेले स्त्री-पुरुष मुलांना पाहिजे, तेवढा वेळ ( ‘क्वॉलिटी टाईम’) देऊ शकत नाही. केवळ भौतिक सुखाच्या मागे धावल्याने नव्हे तर शासकीय धोरणांमुळेही आज माणूस हसणे विसरला आहे. लोकांचे हास्य कायम टिकावे ते आनंदी रहावेत म्हणून डॉ. अनिल अवचट यांनी बासरीच्या एका सुरात जगातील सर्व ताण तणाव विसरायला सांगितले.
केवळ सांगून न थांबता कविता, पोवाडे, ऑरिगॅमी, बासरीवादन करून प्रात्यक्षिकही करून दाखवले. बालगोपालांना ‘आनंदी रहा आणि आनंदाने जगा’, असा मूलमंत्र दिला. छोटय़ा छोटय़ा गोष्टीतून आनंदोत्सव साजरा होऊ शकतो हे डॉ. अवचट यांनी औपचारिक गप्पांमधूनही सांगितले. दुपारी माधवनगर सभागृहात त्यांच्या बासरी आणि ऑरिगॅमी कार्यक्रमाने बालगोपालांना थक्क केले. बासरी वादन सुरू असताना सभागृहात शांतता होती. ऑरिगॅमीतून प्राणी, वस्तूंचे वेगवेगळे आकार करून त्यांनी मुलांना फारच प्रभावित केले. कुठलीही कला जोपासली पाहिजे, त्यातून आनंद मिळतो. तणावमुक्त शांतता मिळते, हेच त्यांनी त्यांच्या औपचारिक गप्पातूनही सांगितले. चंद्र कसा शीतल आहे? सूर्य कसा तेज आहे किंवा पाणी कसे निर्मळ आहे? इत्यादी प्रश्न उपस्थित करून त्यांनी मुलांनाही कोडय़ात टाकली आणि नंतर कृतीतून त्याची उत्तरेही दिली.
निरामय बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या वार्षिकोत्सवात सहभागी होण्यासाठी ते नागपुरात आले. आज ग्रामीण गर्भवती महिलांसाठी गर्भसंस्कार, किशोरी व्यक्तिमत्त्व विकास प्रशिक्षण, संगीतसंध्या ‘बावरा मन’, ग्रामोत्थान प्रदर्शन आणि ग्रामीण प्रदर्शन सादरीकरण असा चौफेर कार्यक्रम करण्यात आला. त्यात बालगोपालांनी तन्मयतेने भाग घेत कला सादर केल्या. सचिव डॉ. उर्मिला क्षीरसागर आणि अध्यक्ष श्रीप्रकाश पंडा यांचे यावेळी सहकार्य लाभले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 18, 2017 12:10 am