साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांची टीका 

साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद देताना स्त्री-पुरुष असा भेद असू नये. प्रतिभावंताला अध्यक्षपद मिळायला हवे. मालतीबाई बेडेकर, सरोजिनी वैद्य यांच्याप्रमाणेच अनेक प्रतिभावंत महिला साहित्यिकांच्या कर्तृत्वाची दखलच महामंडळाने घेतली नाही. महामंडळाने महिला साहित्यिकांना डावलले, अशी टीका ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी सोमवारी केली. विदर्भ साहित्य संघाच्या ९६व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अरुणा ढेरे यांचा सत्कार आणि मुलाखतीचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

संघाच्या सांस्कृतिक संकुलात वाङ्मय पुरस्कार वितरणानंतर डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी यांनी ढेरे यांची प्रकट मुलाखत घेतली. ढेरे म्हणाल्या, मराठीत अनेक प्रतिभावंत निर्माण झाले. त्यात प्रतिभावंत महिलाही होत्या. पण, अध्यक्षपदाच्या शर्यतीत त्यांना डावलण्यात आले. एकप्रकारे महामंडळाने महिला साहित्यिकांवर अन्यायच केला.

काही गोष्टी दैवदत्त असतात. या देशात आपण जन्मलो म्हणून रामायण आणि महाभारताचा वारसा आपल्याला लाभला. इतरत्र तो लाभण्याची शक्यता नव्हती. तसेच वडील अण्णा उर्फ रा.चिं. ढेरे यांच्या घरी जन्म घेणे हा दैवी प्रसाद होता. मानसिक आणि वैचारिक प्रवास अण्णासोबत खूपच चांगला होता. स्वातंत्र्य उपभोगतानाच ‘शहाणपणा’च्या जबाबदारीचे भान अण्णांनी दिले. त्यांनी अरुण कोल्हटकर वाचायला देतानाच ‘गोलपीठा’ही वाचायला दिला. इतर जाणिवांसह आपली लेखन दृष्टी असावी असा संस्कार त्यांनी केला. मी माणसांमध्ये रमणारी, सार्वजनिक जीवनात जगणारी याचे त्यांना विशेष कौतुक असायचे.

माझ्या कवितांचे त्यांना कौतुक असावे. म्हणूनच नंतर मी जे लिहिले ते त्यांना दाखवायचे ठरले. मनातल्या विचारांचा पहिला भाषिक अनुवाद म्हणजे कविता! आपला आवाज उमटत जातो. ती कविता! नकळत कविता घडत जाते. संवादावर माझा फार विश्वास आहे. माणूस बदलण्याची प्रक्रिया अनेक पातळ्यांवर होत असते. तसे न करणाऱ्यांना किंवा आक्रोश करणाऱ्यांच्या वेदना मला मिळाल्या नाहीत.