डॉ. आंबेडकर विद्यार्थी संघटनेचा आरोप; ‘जेएनयू’तील हल्ल्याचा तीव्र निषेध

नागपूर : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हल्ला म्हणजे  न्याय्य मागण्यांसाठी समोर येणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होता, असा आरोप करीत डॉ. आंबेडकर विद्यार्थी संघटने या हल्ल्याचा निषेध केला.

आज मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना  रस्त्यावर उतरली.  विद्यापीठ परिसरात डॉ. आंबेडकर विद्यार्थी संघटनेने हल्ल्याचा निषेध केला. याचवेळी अभाविपने डाव्या विचारसरणीच्या विरोधात घोषणाबाजी केली. दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जेएनयूतील हल्ल्याच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या वतीने नागपूर विद्यापीठाच्या अमरावती मार्गावरील शैक्षणिक परिसरासमोर निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली. रविवारी विद्यार्थी वसतिगृहातील शुल्कवाढीच्या विरोधात जेएनयू स्टुडंट युनियनच्या आंदोलनादरम्यान काही विद्यार्थ्यांनी बुरखा घालून आंदोलनकत्रे व शिक्षकांवर तुफान दगडफेक करीत जेएनयू स्टुडंट युनियनचे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांना जखमी केले होते.  या घटनेच्या निषेधार्थ यावेळी बंद करो, बंद करो, गुंडागर्दी बंद करो, निकले हम मैदान मे विद्यार्थी सम्मान मे अशा घोषणा देण्यात आल्या. अभाविपच्या कृत्याचा आम्ही निषेध करतो, असे आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भूषण वाघमारे यांनी सांगितले. या आंदोलनात मोठय़ा संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

प्राध्यापक संघटना गप्प

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघटनेच्या आंदोलनामध्ये विद्यापीठ परिसराच्या विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. जेएनयू प्रकरणाचा निषेध म्हणून विद्यापीठातील प्राध्यापकांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले होते. मात्र, विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरातील कुणीच प्राध्यापक आंदोलनाकडे फिरकले नाही.

राष्ट्रविरोधकांना धडा शिकवायलाच हवा ; ‘अभाविप’ची मागणी; विद्यापीठ परिसरात आंदोलन

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील घटनेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आज मंगळवारी नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनात मोठय़ा संख्येने अभाविपच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी डाव्या संघटना जाणीवपूर्वक दहशत निर्माण करीत असल्याचा आरोप अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच ‘भारत माता की जय’अशा घोषणा देत देशाचे तुकडे तुकडे करण्याची भाषा करणाऱ्यांना धडा शिकवायलाच हवा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. विद्यार्थ्यांना संबोधित करताना महानगर सरचिटणीस अमित पटले यांनी सांगितले की, अभाविप ही अशा हल्ल्यांसाठी प्रसिद्ध नाही. माध्यमांमध्ये पेरण्यात आलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे संघटनेची प्रतिमा मलिन करण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जाऊ न त्यांना अभाविपची बाजू समजावून सांगण्यात येत आहे. सोमवारी अभाविपने लॉ कॉलेज, सी.पी. अ‍ॅण्ड बेरार महाविद्यालय आणि सूर्योदय अभियांत्रिकी विद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अभाविप ही रचनात्मक कार्य करणारी संघटना असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले.

संघ परिवाराचाही सहभाग

अभाविपने पुकारलेल्या या आंदोलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. संघ परिवारातील विविध संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनात भाग घेतला होता. केंद्रात २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यापासून अभाविपने जेएनयूमधील डाव्या विचारधारेच्या विरोधात आंदोलन छेडले आहे. रविवारच्या जेएनयूमधील हल्ल्यानंतर डाव्या विचारधारेच्या विरोधात अभाविपच्या आंदोलनात संघ परिवार सक्रिय झाल्याचे दिसले.