22 April 2019

News Flash

डॉ. पालतेवारांना दोन कोटी वेतन हवे होते

डॉ. पालतेवार यांनी रुग्णांच्या नावाने व्हाऊचरद्वारे रुग्णालयातून कोटय़वधी रुपयांची उचल केली.

(संग्रहित छायाचित्र)

पोलीस तपासात माहिती उघड; ‘मेडिट्रीना’तील सावळागोंधळ

व्हीआरजी प्रा. लि. कंपनीच्या मेडिट्रीना रुग्णालयाला अल्पावधीत चांगले यश मिळाले. आपल्या प्रयत्नामुळेच हे शक्य  झाले, असे डॉ. समीर पालतेवार यांना वाटल्याने त्यांनी कंपनीकडे महिन्याला २ कोटी रुपये वेतन व शस्त्रक्रियेनुसार अतिरिक्त  पैशांची मागणी केली होती. कंपनीत केवळ तीन संचालक असल्याने पालतेवार हे पत्नीसह मिळून निर्णय घेत व तिसऱ्या संचालकास अंधारात ठेवत होते, अशी धक्कादायक बाब पोलीस तपासात समोर येत आहे.

डॉ. समीर पालतेवार रा. फार्मलँड, रामदासपेठ, गणेश चक्करवार आणि गीतेश मुत्तेमवार यांनी संयुक्तपणे २००६ मध्ये व्हीआरजी कंपनीची स्थापना केली व रामदासपेठमध्ये मेडिट्रीना रुग्णालय सुरू केले. हे रुग्णालयाला अल्पावधीतच चालायला लागले. दरम्यान, पालतेवार यांनी अतिरिक्त पैसा कमावण्यासाठी ‘वेगळी’ वाट धरल्याने याची माहिती इतर संचालकांना झाली व त्यांनी कंपनी सोडली. त्यामुळे  चक्करवार व पालतेवार हे दोघेच प्रत्येकी ५० टक्क्याचे भागीदार होते. दरम्यान चक्करवार यांना रुग्णालय विस्तारासाठी बँकेतून कर्ज घेण्याची गरज वाटली. सर्व व्यवस्थापन पालतेवार हे बघत असल्याने कर्ज घेण्यासाठी चक्करवार  यांनी आपल्या ५० टक्के भागीदारीपैकी १७ टक्के समभाग पालतेवारांना दिले. कर्ज घेतल्यावर ते चक्करवार यांना १३ टक्केसमभाग परत करणार होते.  कंपनीची ६७ टक्के भागीदारी आल्यावर पालतेवार हे कंपनीचे मालक असल्यागत वागू लागले.  तसे दस्तावेज तयार केले व आपल्या घरचा पत्ता हा कार्यालयीन पत्ता दाखवला. पत्नीला अतिरिक्त संचालक केले. त्यानंतर तीन संचालकांच्या बैठकीमध्ये त्यांनी स्वत:करिता महिन्याला २ कोटी रुपये वेतनाचा प्रस्ताव ठेवला. तसेच शस्त्रक्रियेनुसार अतिरिक्त मानधनाचीही मागणी केली. त्या प्रस्तावाला चक्करवार यांनी विरोध केला होता. याला चक्करवार यांनी लोकसत्ताशी बोलताना दुजोरा दिला. दरम्यान, पालतेवार यांनी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांकडून मोठय़ा प्रमाणात पैसे उकळायचे. त्यांनी रुग्णांच्या नावे विविध शासकीय योजनांमध्ये दाखवून फसवणूक केली.

यासंदर्भात सीताबर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. पालतेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनीला प्रतिसाद दिला नाही.

अनेक देगणी पुस्तिका गहाळ

डॉ. पालतेवार यांनी रुग्णांच्या नावाने व्हाऊचरद्वारे रुग्णालयातून कोटय़वधी रुपयांची उचल केली. आतापर्यंत ४ कोटी रुपयांच्या गैरव्यवहार समोर आला असून अनेक देणगी पुस्तिका (व्हाऊचर बूक) गहाळ असल्याची माहिती आहे. पोलीस आजवरच्या सर्व देणगी पुस्तीका शोधत असून पालतेवारांना लवकरच अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आरोग्यमित्रही अडकला होता

दोन वर्षांपूर्वी मेड्रिटीनाच्या आरोग्यमित्रासह दोघांना हॉस्पिटलमध्येच लाच घेताना लालचलुत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. शीतल मधुकर गायकवाड (३१) व अहमद रजा कमाल पाशा सय्यद (२३), या दोघांना १५ हजारांची लाच घेताना अटक झाली होती. शीतल हा मेड्रिटीना हॉस्पिटलचा आरोग्य मित्र होता, तर रजा हा मेयो हॉस्पिटलमध्ये काम करीत होता. आता चार कोटींचा घोटाळा समोर आल्याने  शीतल व रजा याच्याही गुन्हे शाखेकडून चौकशी होण्याची शक्यता बळावली आहे.

दस्तावेज पोलिसांकडून जप्त

या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक निरीक्षक प्रमोद घोंगे करीत असून त्यांनी बुधवारी मेडिट्रीना रुग्णालय व पालतेवार यांच्या घरी छापा टाकून झाडाझडती घेतली. यावेळी रुग्णालयातील अनेक दस्तावेज पोलिसांनी जप्त केले आहे. त्याशिवाय पोलिसांनी मेडिट्रीनासंदर्भात प्राप्तीकर विभागाकडूनही माहिती मागवली आहे.

First Published on January 24, 2019 1:47 am

Web Title: dr paltewar needed two crore wages