साहिल सय्यदसह रुग्णालय व्यवस्थापनाची ‘बैठक’

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : खंडणीसाठी एलेक्सिस रुग्णालयातील डॉक्टरला धमकी दिल्याप्रकरणी अडचणीत आलेला साहिल सय्यद याच्यासह मिळून डॉ. प्रवीण गंटावार यांनी रुग्णालय व्यवस्थापनाशी तडजोडीचा प्रयत्न केला होता, अशी माहिती पोलीस तपासात निष्पन्न होत आहे. या माहितीने डॉ. गंटावार यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मानकापूर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्य़ात साहिल सय्यदसोबत नीलिमा जयसवाल ही सहआरोपी आहे. ती पूर्वी एलेक्सिस रुग्णालयात काम करायची. या माध्यमातून तिने तेथील बडय़ा अधिकाऱ्याला जाळ्यात अडकवले होते. बडा अधिकारी विदेश दौऱ्यावर जात असताना तिने आपत्कालीन काळात कामाच्या अधिकारासाठी दोन मुद्रांकावर स्वाक्षरी घेऊन ठेवली होती. अधिकारी विदेश दौऱ्यातून परतल्यानंतर त्याला ती ब्लॅकमेल करू लागली. एक दिवस अधिकाऱ्याने तिचा पाठलाग केला असता ती साहिल सय्यदच्या माध्यमातून हा प्रकार करीत असल्याचे समोर आले. त्यावेळी साहिलने अधिकाऱ्याला मारहाण केली. तो आपल्याविरुद्ध तक्रार देईल, या भीतीने नीलिमाने आपल्या बहिणीच्या माध्यमातून त्याच्याविरुद्धच विनयभंगाची तक्रार केली. दुसरीकडे साहिल हा त्या डॉक्टरला तडजोड करण्यासाठी धमकावत होता.

हा अधिकारी एलेक्सिस रुग्णालय व्यवस्थापनातील सर्वोच्च पदावर असल्याने साहिल व नीलिमाने रुग्णालयातील अनियमिततेची महापालिकेत तक्रार केली. या तक्रारीच्या आधारे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार हे पाहणीकरिता गेले. त्रुटी दाखवून रुग्णालयातील इको मशीन जप्त केल्या. या कारवाईमुळे एलेक्सिस रुग्णालयाचे व्यवस्थापन धास्तावले. त्यानंतर डॉ. गंटावार यांनी एलेक्सिसच्या डॉक्टरांना स्वत:च्या रामदासपेठ येथील कोलंबिया रुग्णालयात बोलावून साहिलसोबत तडजोड करण्यास सांगितले. त्यावेळी साहिलही त्यांच्या रुग्णालयात उपस्थित होता, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली.

सर्व कारवाई कायदेशीर

एलेक्सिस रुग्णालयातील इको मशीन बीएएमएस महिला डॉक्टर संचालित करीत असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यानंतर रुग्णालयात पाहणी करण्यात आली. रुग्ण व इतरांचे जबाब नोंदवण्यात आले. त्यावेळी ही बाब स्पष्ट झाली व महापालिकेच्या सल्लागार मंडळाच्या आदेशान्वये इको मशीन्स जप्त करण्यात आल्या. या संपूर्ण बाबींचे चलचित्र घेण्यात आले. एलेक्सिस रुग्णालयाने मशीन्स सोडवून घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ही कारवाई अतिशय पारदर्शी पद्धतीने झाली असून मी  साहिल सय्यदच्या प्रकरणात तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. माझी बदनामी करण्यासाठी खोटी माहिती पसरवण्यात येत आहे.

– डॉ. प्रवीण गंटावार