27 November 2020

News Flash

शासकीय आयुर्वेदचा डॉ. बोंदर युपीएससीत देशभरातून १२४ वा

त्याची यशोगाथा त्याच्या सत्कारानंतर पुढे आली आहे.

भारतीय नागरी सेवा स्पर्धा परीक्षेत शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी डॉ. सिद्धेश्वर बोंदर याने नेत्रदीपक कामगिरी केली असून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याची यशोगाथा त्याच्या सत्कारानंतर पुढे आली आहे. इतर यशवंतांच्या गाजावाज्यात तो झाकोळलाच गेला होता.
देशपातळीवरील त्याचा गुणानुक्रम १२४ वा आहे. या महाविद्यालयातून पहिला आयएएस असल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षांव होत आहे. सिद्धेश्वरने तिसऱ्या प्रयत्नात हे यश प्राप्त केले. मुळचा उस्मानाबाद जिल्ह्य़ातील एका खेडय़ात राहणारा, आयुर्वेदाचे शिक्षण घ्यायला नागपुरात आलेला आणि युपीएससीचा अभ्यास पुण्यात केलेल्या सिद्धेश्वरचे वडील बळीराम आणि आई किसकिंदा शेती करतात. घरी पाच एकर शेती आहे. मात्र, मराठवाडय़ात गेल्या काही वर्षांपासूनचा दुष्काळ पाहता शेतीची अवस्था वाईट आहे. अशा परिस्थितीत सिद्धेश्वरने नागपुरात पदवी शिक्षण पूर्ण केले. काही काळ त्याने अर्धवेळ कामही केले. मात्र, अभ्यासासाठी नंतर त्याने ते सोडले.
युपीएससीची खाजगी शिकवणी वर्ग त्याने लावले नव्हते, पण एमपीएससीसाठी पुण्याच्या भगीरथ अकादमीत मार्गदर्शन घेतल्याचे तो म्हणाला. डॉ. बोंदर याच्या उत्तुंग भरारीबद्दल शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व माजी विद्यार्थी संघटनेच्यावतीने सत्कार सोहळा येथे आयोजित करण्यात आला होता. सिद्धेश्वरच्या आगमनाच्या वेळी ढोलताशांच्या गजरात व फटाके वाजवून जल्लोषाने अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात त्याचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी येथील अधिष्ठाता डॉ. गणेश मुक्कावार उपस्थित होते. शेती आणि ग्रामीण प्रश्नांच्या सोडवणुकीत सिद्धेश्वरला विशेष रस असून दुर्बल, मागास घटकांसाठी काम करण्याची मनीषा त्याने व्यक्त केली.

एमपीएससीच अवघड वाटली..
महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि केंद्रीय लोकसेवा आयोग या दोन्हीची परीक्षा सिद्धेश्वर देत आला आहे, पण त्याला युपीएससीपेक्षा एमपीएससी अवघड वाटते. सिद्धेश्वर म्हणाला, एमपीएससीमध्ये आवाका मोठा आणि प्रश्नांचे वस्तुनिष्ठ स्वरूप आहे, तर युपीएससीमध्ये विश्लेषणाबरोबरच मत मांडण्याची मुभा आहे. चालू घडामोडींवर युपीएससी भर देते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 16, 2016 12:04 am

Web Title: dr siddheshwar bondar
टॅग Upsc Exam
Next Stories
1 ‘नीट’च्या निर्णयामुळे एका पिढीचे नुकसान
2 सक्षम विदर्भ हवा की मागास हे मागणाऱ्यांनी ठरवावे – पांडे
3 नागपुरात डब्बा ट्रेडिंगवर छापा
Just Now!
X