01 December 2020

News Flash

अवयव प्रत्यारोपणाला चळवळीचे स्वरूप यावे

सुपरस्पेशालिटी रुग्णालयाने तब्बल दहा मुत्रपिंडांच्या प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत.

’ नियम सोप्या भाषेत सांगून प्रत्यारोपण वाढीवर भर ’  डॉ. विभावरी दाणी यांचे प्रतिपादन ’ लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

विदर्भासह शेजारच्या चार राज्यांतील शेकडो रुग्ण उपचारासाठी शहरात येतात. त्यापैकी काही ‘ब्रेन डेड’सुद्धा असतात. त्यांच्या अवयव दानातून अनेकांना जीवदान मिळणे शक्य असते. परंतु अवयवदानाची माहिती लोकांना नसल्याने ही प्रत्यारोपणाची प्रक्रिया होत नाही. त्यामुळे याबाबत जनजागृती करण्यासाठी चळवळ राबवण्याचा आमचा प्रयत्न आहे. याला सर्व रुग्णालयांचे सहकार्य मिळाल्यास विदर्भात ही चळवळ रुजेल व यशस्वी होईल, असा विश्वास विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समितीच्या अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी यांनी व्यक्त केला.

‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्या बोलत होत्या. महाराष्ट्रात केवळ नागपुरलाच मेडिकल व मेयो ही दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांसह सुपरस्पेशालिटी व डागा हे दोन महत्त्वाची शासकीय रुग्णालये आहेत. लता मंगेशकर या खासगी वैद्यकीय महाविद्यालयासह अनेक लहान- मोठी खासगी रुग्णालयेही शहरात असून सर्वत्र तज्ज्ञ डॉक्टरांसह अद्ययावत उपकरणेही उपलब्ध आहेत. शहरात उपलब्ध असलेल्या वैद्यकीय सेवा-सुविधा बघता येथे विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, ओडिशा या राज्यांतील रुग्ण मोठय़ा संख्येने उपचाराकरिता येतात. सुपरस्पेशालिटीत किडनी प्रत्यारोपणासह हृदयरोग, मेंदूसह इतर शस्त्रक्रियेच्या सोयी येथे उपलब्ध आहेत. विविध रुग्णालयांत उपचारादरम्यान रुग्णांचे ‘ब्रेन डेड’ होते. महत्त्वाचे म्हणजे अनेक खासगी व शासकीय रुग्णालयांतील डॉक्टरांनाही रुग्णांना कायदेशीरपणे ‘ ब्रेन डेड’  घोषित कसे करावे याबाबत माहिती नसते. त्यामुळे अशा रुग्णांच्या अवयवदान प्रक्रियेलाच खीळ बसते.

वास्तविक ‘ब्रेन डेड’ रुग्णाची दोन मुत्रपिंडे, यकृत, हृदय, बुब्बुळ, त्वचेसह इतर अवयवदानामुळे अनेकांचा जीव वाचणे शक्य आहे. विदर्भात अवयव दान करणाऱ्या सेंटरमध्ये नागपूरच्या सुपरस्पेशालिटी या शासकीय रुग्णालयांसह इतर खासगी अशी सहा ठिकाणी सोय आहे. त्यात नागपूरची पाच व सावंगी, वर्धा येथील एका केंद्राचा समावेश आहे. इतर भागात एकही प्रत्यारोपण केंद्र नाही. येथे केंद्र नसले तरी तेथील खासगी रुग्णालयांत होणाऱ्या ‘ब्रेन डेड’ रुग्णांची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अवयव उपलब्ध झाल्यास त्याचे प्रत्यारोपण शक्य आहे. सुपरस्पेशालिटी रुग्णालयाने तब्बल दहा मुत्रपिंडांच्या प्रत्यारोपणाच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यात सगळे अवयव हे जिवंत व्यक्तीकडून दान स्वरूपात मिळाले.

तेव्हा जास्तीत जास्त ब्रेन डेड रुग्णांचे अवयवदान वाढवण्याकरिता लवकरच नवीन मार्गदर्शक सूचना सोप्या भाषेत उपलब्ध होतील, असेही डॉ. दाणी म्हणाल्या.

प्रतीक्षा यादी लवकरच ‘ऑनलाईन’

अवयव प्रत्यारोपणाची गरज असलेल्या विदर्भातील रुग्णांची प्रतीक्षा यादी विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीकडून ‘ऑनलाईन’ उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यावर काम सुरू आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांनाही याच पद्धतीने त्यांची यादी तयार करावी लागेल व त्यानुसारच अवयव प्रत्यारोपण करता येईल. यामुळे जास्त रक्कम देणाऱ्या रुग्णांना प्राधान्य देण्याचे काही खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या प्रयत्नांना चाप बसेल, असे डॉ. दाणी म्हणाल्या.

समन्वय केंद्रासाठी प्रयत्न

मुंबईत विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र २४ तास काम करते. निश्चितच त्यामुळे राज्यात सर्वाधिक प्रत्यारोपणांची नोंद  मुंबईत होते. तेथे प्रत्यारोपणासाठी आवश्यक तज्ज्ञांसह सगळ्या सुविधा उपलब्ध असणेही महत्त्वाचे कारण आहे. नागपुरातही विभागीय अवयव प्रत्यारोपण केंद्र २४ तास सुरू राहिल्यास विविध रुग्णालयांशी समन्वय वाढून ब्रेन डेड रुग्णांचे अवयव मिळून या चळवळीला गती मिळू शकेल. त्याकरिता प्रयत्न सुरू असल्याचे डॉ. दाणी म्हणाल्या.

मुत्रपिंड प्रत्यारोपणाची प्रतीक्षा यादी

 रक्त गट              संख्या

ए पॉझिटिव्ह           ५२

ओ पॉझिटिव्ह         ८८

बी पॉझिटिव्ह          ५३

एबी पॉझिटिव्ह        १५

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 6, 2017 1:01 am

Web Title: dr vibhavari dani visit nagpur loksatta office
Next Stories
1 आर्थिक सुधारणांच्या निर्णयांकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष – गिरीश कुबेर
2 वैदर्भीय विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्वासाठी रस्सीखेच
3 आता भाजपचे ‘डॅमेज कंट्रोल’
Just Now!
X