News Flash

‘विकेल ते पिकेल’मध्ये ड्रॅगन फ्रूट आणि केशोरी मिरची!

मिरचीचे उत्पादन गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात वाढवून ते सरासरी ४०० हेक्टरपर्यंत नेण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे.

नागपूर विभागात कृषी खात्याचे नियोजन

नागपूर : खरीप पिकाचे नियोजन करताना ‘विकेल ते पिकेल’  या योजनेंतर्गत नागपूर विभागात ड्रॅगन फ्रूट तसेच गोंदिया जिल्ह्यातील केशोरी मिरचीला प्राधान्य देण्यात आले आहे.

कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या बैठकीत भाजीपाला, फळपिके व मसाला पिकासारख्या ग्राहकोपयोगी उत्पादनाला नागपूर विभागात प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील केशोरी या गावात गर्द लाल रंगाची व मध्यम तिखट असलेल्या मिरचीची लागवड केली जाते. सध्या देवरी, मोरगाव अर्जुनी या दोन तालुक्यात २०० हेक्टर केशोरी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. इतर मिरची पिकापेक्षा या मिरचीचे उत्पादन  एकरी पाच ते सहा क्विंटल अधिक होते. पिकावर किडीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आहे. कमी फवारणीत चांगले पीक येते व त्याला मागणीही अधिक आहे. या मिरचीचे उत्पादन गोंदिया जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात वाढवून ते सरासरी ४०० हेक्टरपर्यंत नेण्याचे कृषी विभागाचे नियोजन आहे.

१९.३५ लाख हेक्टरवर खरीप नियोजन

विभागात १९.३५ लाख हेक्टरवर खरीप नियोजन करणार असल्याचे राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. सोमवारी नागपुरात पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांच्या खरीप हंगामाची आढावा बैठक भुसे यांनी घेतली. बचत भवन सभागृहात झालेल्या या बैठकीत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, दूरदृश्यप्रणालीद्वारे  नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशीष जयस्वाल, दुष्यंत चतुर्वेदी, राजू पारवे, विनोद अग्रवाल आदी लोकप्रतिनिधी तसेच जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, महाबीजचे पाटील, कृषी सहसंचालक रवींद्र भोसले तसेच विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन मार्गदर्शन करावे, असे आदेश यावेळी दिल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषीरत्न  सुनंदा सालोडकर यांचा गौरव  करण्यात आला, कृषी सहसंचालक भोसले यांनी प्रास्ताविक केले.

कोविड काळात ६ हजार ८०५ क्विंटल विक्री

कोविड काळात शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी शेतकरी उत्पादक गट, शेतकरी गट तसेच आत्माअंतर्गत शेतमालाच्या विक्रीची नागपूर विभागात व्यवस्था करण्यात आली होती. विभागातील ५५० शेतकरी उत्पादक गटाच्या माध्यमातून ३७२ विविध ठिकाणावरून ऑनलाईन तसेच थेट नोंदणीच्या माध्यमातून ६ हजार ८०५ क्विंटल इतकी विविध कृषी उत्पादनांची विक्री करण्यात आली.  कोविड काळातील शेतमाल विक्रीमध्ये नागपूर जिल्ह्यात ३ हजार ७१३ क्विंटल, गोंदिया जिल्ह्यायात १००८ क्विंटल, चंद्रपूर जिल्ह्यात ७२० क्विंटल, वर्धा जिल्ह्यात ६८९ क्विंटल, भंडारा जिल्ह्यात १३५ तर गडचिरोली जिल्ह्यात ५४०क्विंटल विविध कृषी उत्पादने थेट ग्राहकांना या प्रकल्पाअंतर्गत विक्री करण्यात आली आहे.

महाबीजतर्फे  बियाण्यांऐवजी निधी

महाबीजतर्फे शेतकऱ्यांना थेट बियाणे उपलब्ध न करता  त्यांना आवश्यकतेनुसार बियाणे खरेदीसाठी त्यांच्या खात्यात थेट निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2021 12:04 am

Web Title: dragon fruit and cauliflower akp 94
Next Stories
1 भाजपशासित राज्यात करोना आकड्यांची लपवाछपवी
2 चालकाने ऑटोलाच रुग्णवाहिकेत बदलले!
3 जिल्ह्य़ात करोनाचा प्रभाव ओसरतोय..
Just Now!
X