News Flash

अभिनयाचे पारितोषिक पाहणे सम्यकच्या नशिबी नव्हते

बाल नाटय़कलावंताच्या अकाली निधनाने हळहळ

बाल नाटय़कलावंताच्या अकाली निधनाने हळहळ

बालनाटय़ स्पर्धेत आठ दिवसांपूर्वी त्याने केलेल्या अभिनयाने सर्व प्रेक्षक भारावून गेले होते. हा मुलगा भविष्यात मोठे नाव कमावणार अशी खूणगाठ त्यादिवशी अनेकांनी मनाशी बांधून घेतली होती. आता साऱ्याचे लक्ष स्पर्धेच्या निकालाकडे होते. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते. या स्पर्धेत अभिनयाचे पारितोषिक मिळवणारा सम्यक गजभिये आज सकाळी निकाल लागला तेव्हा हे जग सोडून गेला होता. अंगात भिनलेला ताप डोक्यात जाण्याचे साधे निमित्त त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरले. या गुणी कलावंताची अकाली एक्झिट केवळ त्यांच्या कुटुंबाला नाही तर स्पर्धेसंबंधित साऱ्यांना रडवून गेली.

सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित १५ व्या बाल नाटय़ स्पर्धेत आठ दिवसांआधी ‘बालभगत’ या नाटय़ातून आपल्या अभिनयाचे कसब दाखवत रसिकांची दाद मिळवणारा सम्यक अनिल गजभिये (१२)या बाल कलावंताचे आज अकाली निधन झाले.

सम्यक हा शताब्दी चौकातील रमाई नगरात राहात होता व तो बिपीन कृष्णा शाळेचा सातवीचा विद्यार्थी होता. दोन दिवसापूर्वी त्याला ताप आला. त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ताप डोक्यात शिरल्याने त्याचे आज निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील आणि एक लहान भाऊ आहे. त्याच्यावर मानेवाडा स्मशानभूमीवर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

लहानपणापासूनच नाटकाची आवड असणाऱ्या सम्यकने मोठा नट होण्याचे स्पप्न उराशी बाळगले होते व त्यादृष्टीने त्याची वाटचालही सुरू होती. त्याने यापूर्वी रमाई, डोंबारी, भट्टी या बालनाटय़ात भूमिका केल्या होत्या. राज्य नाटय़ स्पर्धेत सादर करण्यात आलेल्या ‘विठाबाई’ मध्येही त्याची छोटी भूमिका होती. पाच वर्षांपूर्वी तो नाटय़ कलावंत संजय जीवने आणि सांची जीवने यांच्या संपर्कात आला. त्यांच्यासोबत वेगवेगळ्या नाटकात काम करू लागला. बाल नाटय़ स्पर्धेत बौद्ध रंगभूमीच्यावतीने ‘बालभगत’ नाटय़प्रयोग सादर करण्यात आला होता. त्यात सम्यकने भगतसिंगच्या मित्राची भूमिका साकारली होती. त्यांच्या अभिनयाला रसिकांची दाद मिळाली. त्याच्यासह इतर कलावंतांचे स्पर्धेच्या निकालाकडे लक्ष लागले होते. आपल्या नाटकाला पहिला क्रमांक मिळावा म्हणून तो आणि त्याचे सहकलावंत दररोज १० ते ११ तास तालीम करीत असत. स्पर्धेचे निकाल जाहीर होण्यापूर्वीच सम्यक काळाच्या पडद्याआड गेला होता. आज नाटय़स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. यात त्याला अभिनयाचे प्रमाणपत्र जाहीर झाले. मात्र, ते पाहण्याचे भाग्य सम्यकच्या नशिबी नव्हते, त्यापूर्वीच तो जग सोडून गेला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 23, 2018 3:07 am

Web Title: drama actor samyak gajbhiye death due to fever
Next Stories
1 रद्द केलेल्या रेल्वे तिकिटांचा ऑनलाईन परतावा विलंबाने
2 मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्य़ात  ७० टक्के निधीच खर्च
3 एमसीआयच्या निरीक्षणासाठी परिचारिकांचीही पळवा-पळवी
Just Now!
X