शस्त्रक्रियेनंतरची जखम भरत आली

सात वर्षांपूर्वी उपराजधानीत दाखल झालेला ‘साहेबराव’ वाचणार का, वाचला तरी त्याला कायमचे अपंगत्व येईल, असाच अंदाज जवळपास सर्वानी वर्तवला होता. मात्र, ‘त्या’ची जगण्याची जिद्द आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न यातून त्याचा जीव वाचला. तब्बल दोनवेळा शस्त्रक्रिया झालेल्या ‘साहेबराव’ची दुसऱ्या शस्त्रक्रियेनंतरची जखम भरत आली आहे. त्यामुळे त्याला कृत्रिम पाय बसवण्याचा मार्ग  मोकळा होताना दिसत आहे.

चंद्रपूर जिल्ह्यतील गोंडमोहाळीच्या जंगलात २०१२ साली शिकाऱ्यांनी लावलेल्या जाळ्यातून ‘साहेबराव’ कसाबसा वाचला. मात्र, लोखंडी जाळ्याचे विष त्याच्या बोटांमध्ये पसरल्याने तो जगेल का आणि जगला तरी चालू शकेल का, याबाबत शंकाकुशंका व्यक्त केल्या जात होत्या. चंद्रपूर ते नागपूर असा प्रवास करणाऱ्या या वाघासाठी शहरातील तज्ज्ञ पशुवैद्यकांची चमू धावून आली  आणि पायाची केवळ तीन बोटे  कापून त्याचा जीव वाचवला. एवढेच नाही तर त्याला येणाऱ्या पूर्ण अपंगत्वातून त्याची सुटका केली. काही महिन्यांपासून बोटे कापलेल्या पायाला त्रास सुरू झाला. पाचव्या बोटातून हाड बाहेर आल्यामुळे त्याला पाय टेकवता येत नव्हता. गेल्या पाच-सात महिन्यात हा त्रास प्रचंड वाढल्याने तो ओरडत होता. त्याला जीवदान देणारी तज्ज्ञ पशुवैद्यकांची चमू यावेळीही त्याच्या मदतीसाठी धावून आली.

नऊ ऑक्टोबरला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान त्याला टोचणारा भाग काढून टाकला. आता ही जखम जवळजवळ भरली आहे. त्याला बऱ्यापैकी जमिनीवर पाय टेकवता येत आहे. मात्र, पायाचा तळवा आणखी थोडा मजबूत होण्याची वाट पशुवैद्यक पाहात आहेत. किमान महिनाभर तरी पुन्हा त्याच्यावर लक्ष ठेवावे लागणार आहे. त्यानंतरच कृत्रिम पाय लावण्याच्या दिशेने त्याची वाटचाल सुरू होईल.

ठणठणीत बरा होण्याची वाट बघू

माणसांच्या बाबतीत कृत्रिम पाय सुरुवातीला काही तासांसाठी लावून नंतर तो काढला जातो. हळूहळू हा कालावधी वाढत जातो. वाघाच्या बाबतीत तसे करता येत नाही. त्यामुळे कृत्रिम पाय लावण्याआधी त्याच्यावर केलेल्या शस्त्रक्रियेतून तो ठणठणीत बरा होण्याची वाट बघू. कारण एकदा पाय लावल्यानंतर तो लगेच काढता येणार नाही. म्हणूनच ही सर्व प्रक्रिया आम्ही काळजीपूर्वक करणार आहोत, असे तज्ज्ञ पशुवैद्यकांच्या चमूतील डॉ. शिरीष उपाध्ये यांनी सांगितले.