पोलीस महासंचालकांच्या दररोजच्या आढाव्यात उघड

मद्य प्राशन करून गाडी चालविणे हा गुन्हा आहे, मद्य प्राशन करून वाहन चालविण्यामुळे अपघातांना आमंत्रण देणे होय, असे सर्वज्ञात असतानाही मद्य प्राशन करून वाहन चालविण्याचे प्रमाण राज्यातील शहरांपेक्षा नागपुरात अधिक आहे. ही बाब पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्यामार्फत दररोज घेण्यात येणाऱ्या वाहतूक पोलिसांच्या आढाव्यातून समोर आली आहे.

अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. यात मृत्यूचे प्रमाण अधिक असून मद्य प्राशन करून वाहन चालविणे हा अपघातामागील प्रमुख कारण आहे. महामार्गावर गेल्या साडेचार वर्षांत १२ हजारांवर अपघात झाले. त्यात ५ हजारांवर नागरिकांचा मृत्यू झाला, तर अकरा हजारांवर लोक जखमी झाले. याशिवाय शहरात १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१५ या कालावधीमध्ये नागपूर शहरात ९८८ अपघात नोंदविण्यात आले. त्यात १७४ जणांचा मृत्यू झाला असून ८७३ जण जखमी झाले. याच कालावधीमध्ये १५ हजार २४८ वाहनचालकांविरुद्ध ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ची (डी.डी.) कारवाई करण्यात आली.

राज्यात अपघातांमध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण लक्षात घेऊन पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी वाहतूक पोलिसांना मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवून कारवाई करण्याचे आदेश दिले. मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, ठाणे आदी आयुक्तालयांसह सर्व जिल्हा पोलीस

अधीक्षकांसह महासंचालकांच्या आदेशाचे पालन करीत आहेत. महासंचालक दररोज सकाळी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून कारवायांचा आढावा घेतात. त्यासाठी संपूर्ण राज्यातील वाहतूक शाखेच्या प्रमुखांचा एक समूह तयार करण्यात आला आहे. या समूहावर दररोज कारवायांची आकडेवारी टाकण्यात येते. यावरून नागपूर हे ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’च्या कारवायांमध्ये प्रथम आहे. यावरून मद्यपी वाहनचालकांची सर्वाधिक संख्या नागपुरात अधिक असल्याचे स्पष्ट होते.

जूनपर्यंतची आकडेवारी

विभाग           डी.डी. प्रकरणे

पूर्व                           २,२११

पश्चिम                    १,९०६

उत्तर                       २,८२१

दक्षिण                     २,१४७

इंदोरा                       २,५२१

एमआयडीसी           १,३३६

एकूण                       १२,९४२

 

मद्यपी वाहनचालकांविरुद्ध मोहीम

मद्य प्राशन करून वाहन चालविल्यामुळे अपघात झाल्याचे अनेकदा समोर आले आहे. त्यामुळे पोलीस महासंचालकांनी याकडे विशेष लक्ष देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार राज्यभरातील वाहतूक विभागाचा ते आढावा घेतात. यात नागपुरातील कारवायांचे प्रमाण अधिक आहे. अपघात रोखण्यासाठी मद्यपी वाहनचालकांविरुद्धच वाहतूक विभाग मोहीम राबवित असल्याने हे चित्र आहे.

– स्मार्तना पाटील, वाहतूक पोलीस उपायुक्त