घराघरात नळ जोडण्या देणार

नागपूर : जिल्ह्य़ात ४९ टक्के गावातच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. ५१ टक्के गावांमध्ये ही सोय करावी लागणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या घर तेथे नळयोजनेतून २०२४ पर्यंत दरडोई ५५ लिटर पाणी देण्याचा संकल्प जिल्हा प्रसासनाने केला आहे.

केंद्राच्या योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आढावा बैठक घेतली. त्यात जिल्ह्य़ातील पिण्याच्या पाण्याची सद्यस्थिती पुढे आली. केंद्राच्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेचे स्वरूप बदलवून जल जीवन मिशन तयार करण्यात आले आहे. त्यात घर तेथे नळयोजनेचा समावेश आहे. सध्या दरडोई ४० लिटर पाणी दिले जाते. त्यात वाढ करून ते ५५ लिटर करण्यात आले आहे. जिल्ह्य़ात ४९ टक्के गावातच पिण्याच्या पाण्याची सोय आहे. त्यामुळे उर्वरित ५१ टक्के गावात योजनेची अंमलबजावणी करावी लागणार आहे.

सध्या १५८ गावांमध्ये घरपोच पाणीपुरवठा होत असल्याने तेथे ५५ लिटर पाणी देणे शक्य आहे. यासाठी सोमवापर्यंत नियोजन सादर करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे दिले. सर्व शाळा, अंगणवाडय़ा यांना देखील पुढील १०० दिवसात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता करून देण्याचे उद्दिष्ट या मिशनमध्ये निश्चित करण्यात आले आहे.