यंदाही किमान तापमानाचा उच्चांक मोडीत निघण्याची शक्यता

नागपूर : उपराजधानीत गेल्या काही दिवसात थंडीचा कडाका जाणवत असला तरी रात्रीच्या तापमानात मात्र फारशी घट नाही. गेल्या आठवडाभरात उपराजधानीसह संपूर्ण विदर्भातच रात्रीचे तापमान १३ ते २० अंशाच्या दरम्यान आहे. मात्र, वाऱ्यामुळे थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. त्यामुळे ठेवणीतले ऊबदार कपडे पुन्हा एकदा नागरिकांच्या अंगावर दिसून येत आहेत.

किमान तापमानाचा उपराजधानीचा उच्चांक आहे. दोन वर्षांपूर्वी किमान तापमान तीन अंश सेल्सिअसच्या आसपास पोहोचले होते. उपराजधानीने रात्रीच्या किमान तापमानाची अनेकदा नोंद के ली आहे. यावर्षीदेखील किमान तापमानाचा उच्चांक मोडीत निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. साधारणत: कोजागिरीनंतर थंडी पडायला सुरुवात होते, पण यावेळी त्यासाठी दिवाळी उजाडावी लागली.

दिवाळीनंतर थंडीत चांगलीच वाढ दिसून येत आहे. तापमान कमी म्हणजे थंडी अधिक असे समीकरण असताना तापमानात फारशी घट दिसून येत नाही. मात्र, बोचऱ्या वाऱ्यामुळे अंगाला झोंबणारी थंडी नागपूरकर अनुभवत आहेत. शहरात सध्या मेट्रो आणि सिमेंट रस्ते तसेच अनेक ठिकाणी बांधकाम सुरू आहे.

याठिकाणी काम करणाऱ्या कामगारांसाठी शेकोटीचाच आधार आहे. शहरातील अनेक रस्त्यांवर या शेकोट्या पेटलेल्या दिसून येत आहेत. रात्रीचे सर्वात कमी १३.८ अंश सेल्सिअस तापमान गोंदिया शहरात नोंदवण्यात आले, तर अकोला शहरात १९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. नागपूर शहरात १५.६ अंश सेल्सिअस इतके  रात्रीचे तापमान नोंदवण्यात आले.