महेश बोकडे

करोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना शारीरिक परिस्थितीनुसार ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’च्या गोळ्या घेण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. ही माहिती सामान्यांना कळताच अनेकांनी या गोळ्यांची जोरदार खरेदी केल्याने अनेक औषध दुकानातून त्या गोळ्या गायब झाल्या आहेत.

एकीकडे या औषधांचा तुटवडा होत आहे तर दुसरीकडे मधुमेह, हृदयरुग्णांसह इतर जोखमेतील व्यक्तींनी या गोळ्या खाल्यास त्यांचे आरोग्यच धोक्यात सापडण्याचा धोका आहे.

हिवताप, जॉईंट पेन, कुष्ठरुग्णांना आलेली रिअ‍ॅक्शनसह इतर काही संवर्गातील रुग्णांना डॉक्टर गरजेनुसार ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’ २०० एमजी किंवा ४०० एमजी अथवा इतर गोळ्या खाण्याचा सल्ला त्यांच्या शरीरयष्टी व आरोग्याच्या दृष्टीने देतात.

या गोळ्या डॉक्टरांच्या चिठ्ठय़ांशिवाय दिल्या जात नाही. त्यामुळे अनेकांनी कौटुंबिक डॉक्टरच्या चिठ्ठय़ांवरून त्या घेतल्या तर काहींनी अव्वाच्या सव्वा दराने थेट औषध दुकानदारांकडून घेतल्या. या प्रकाराने शहरातील अनेक दुकानातील या औषध संपल्याची माहिती आहे. दरम्यान या औषधांमुळे खरच गरज असलेल्या रुग्णांना ही औषध मिळत नसल्याने त्यांची पंचाईत होत आहे.

डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कोणत्याही औषध विक्रेत्यांना ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’च्या गोळ्या देता येत नाही.  या औषधांची विक्री वाढल्याने त्याचा अनेक ठिकाणी तुटवडा जाणवत आहे.

– हरीश गणेशानी, सदस्य, द महाराष्ट्र केमिस्ट अ‍ॅन्ड ड्रगिस्ट असोसिएशन.

हिवतापावर उपचार किंवा प्रतिकारशक्ती वाढवायची गरज असलेल्या रुग्ण आणि त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसह इतर कर्मचाऱ्यांना ‘हायड्रोक्सी क्लोरोक्विन’ औषध घेण्याचा सल्ला तज्ज्ञांच्या समितीने दिला आहे. परंतु या औषधांची मात्रा तज्ज्ञांच्या सल्याने निश्चित करणे आवश्यक आहे. त्यातच वृद्ध, मधूमेह, हृदयरुग्णांना या औषध हानीकारक आहे. त्यानंतरही कुणी त्या घेतल्यास या व्यक्तींना गंभीर परिणाम संभवतो. त्यामुळे त्या नाहक घेऊ नये.

– प्रा. डॉ. राजेश गोसावी, विभाग प्रमुख, औषधशास्त्र विभाग, मेडिकल.