वर्धा जिल्ह्यात दारुबंदी असतानाही ज्यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांनीच कायद्याचं उल्लंघन केल्याचं समोर आलं आहे. एका पोलीस कर्मचाऱ्याने दारु पिऊन भररस्त्यात धिंगाणा घातल्याची एक घटना समोर आली आहे. तळेगांव येथे हा प्रकार सुरु होता. संदीप खंडारे असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून शिपाई पदावर कार्यरत आहे. संदीप खंडारे दारु पिऊन धिंगाणा घालत असताना बघ्यांची चांगलीच गर्दी झाली होती. यापैकी काहींनी व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस शिपाई संदीप खंडारेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

संदीप खंडारे हा आष्टी पोलिसांत कार्यरत असून तो सुट्टीवर होता. तळेगांव येथे उड्डाणपुलाखाली तो दारु पिऊन धिंगाणा घालत होता. संदीप खंडारे अत्यंत मद्यधुंद अवस्थेत होता. यावेळी त्याने आपला मोबाइल खिशातून काढून फेकून दिला, तसंच नोटा फाडून रस्त्यावर फेकून दिल्या. संदीप खंडारे हा गोंधळ घालत असल्याचं पाहून त्याला पाहण्यासाठी उड्डाणपुलाखाली बघ्यांची गर्दी झाली होती.

यावेळी काहीजणांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. पण संदीप खंडारे कोणाचंही ऐकण्यास तयार नव्हता. त्याने काहीजणांना शिवीगाळदेखील केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने शेवटी काहीजणांनी पोलिसांशी संपर्क साधत यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी संदीप खंडारेची वैद्यकीय तपासणी करत त्याच्यावर दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. वासवराज तेली यांनी यासंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, “संदीप खंडारे सुट्टीवर असला तरी हा प्रकार पोलीस खात्याची बदनामी करणारा होता”.