नागपूर : मद्यधुंद अवस्थेत असलेला पोलीस शिपाई दुचाकी घेऊन रस्त्यावर पडला. त्याची अवस्था बघून अनेकांना किव येत होती. शेवटी परिसरातील उभ्या तरुणांनी त्याच्यासह दुचाकी रस्त्याच्या कडेला घेऊन डोक्यावर पाणी टाकले व नशा उतरवण्याचा प्रयत्न केला. या शिपायाची मद्यधुंद अवस्थेतील चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने समाजातील शहर पोलिसांची प्रतिमा खालावली आहे. या शिपायावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.

शांताराम मौजे असे मद्यधुंद हवालदाराचे नाव असून तो मुख्यालयात कार्यरत आहे. तो जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साईमंदिर परिसरात राहतो. गेल्या चार आठवडय़ांपासून तो कर्तव्यापासून गैरहजर आहे. त्याने घरगुती कारणांमुळे येऊ शकत नसल्याचा संदेश आपल्या वरिष्ठांना दिला होता. पण, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये तो वर्दी घालून कर्तव्यावर जाण्यासाठी निघालेला दिसत आहे. तो दुचाकी चालवत होता. पण, मद्यधुंद अवस्थेमुळे त्याला दुचाकी सांभाळणेही शक्य होत नव्हते. जरीपटका रिंगरोडवरील गुप्ता मेडिकलच्या विरुद्ध दिशेने जात असताना त्याला दुचाकीवरून वळण घेणे शक्य नव्हते. शेवटी तो रस्त्यावरच पडला.  एका तरुणाने दुचाकी उचलून रस्त्याच्या कडेला नेली, तर त्यापैकी एकानेच नागपूर पोलिसांची अवस्था सांगणारे चलचित्र तयार केले. इतरांवर दारू प्राशन करून वाहन चालवणारे पोलिसच असे मद्यधुंद असतील, तर कसे होईल, असा सवाल त्या तरुणांनी उपस्थित केला. या घटनेची चित्रफित व्हायरल होताच समाजमाध्यमांवर नागपूर पोलिसांची प्रतिमा मलीन करणारे संदेश लोकांकडून येत होते.

शिपायाने हात जोडले

या घटनेनंतर शहर पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याची कुठेतरी शिपायाला जाणीव झाली असावी. त्याने मद्यधुंद अवस्थेत परिसरातील लोकांना हात जोडले. भविष्यात त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

चित्रफित व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. या प्रकरणी मुख्यालयाच्या पोलीस उपायुक्तांकडून अहवाल मागविला असून लवकरच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. अशाप्रकारची वर्तणूक खपवून घेतली जाणार नाही, याची कर्मचाऱ्यांनी आठवण ठेवावी.

– रवींद्र कदम, सहपोलीस आयुक्त.