पोलीस येताच सर्व संगणक एका क्लिकवर बंद
डब्बा ट्रेडिंगवरील आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे शहरातील व्यापारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, पोलिसांनी टाकलेल्या दहा ठिकाणच्या छाप्यांपैकी रवी अग्रवाल याच्या एल-७ समूहाचे कार्यालय सर्वाधिक अद्ययावत होते. पोलीस दारावर दाखल होताच ट्रेडिंग करणारे सर्व संगणक एका क्लिकवर बंद पडले आणि सर्व संगणकांच्या स्क्रीनवर अंधार पसरला.
शिवाय संगणकाचे पासवर्डही रवी अग्रवालशिवाय कुणालाही माहीत नसल्याने संगणकांमधून पोलिसांच्या हाती अद्याप काहीच लागले नसून त्याच्या कार्यालयातील अत्याधुनिक तंत्रज्ञान पोलिसांसाठी आव्हान ठरत आहे.
मुंबईतील कार्यालयावरही छापा
नागपुरातील कार्यालयातील संगणकांचे मुख्य सव्‍‌र्हर मुंबईतील एल-७ सॉफ्टवेअर कंपनीच्या कार्यालयात असण्याचा संशय आहे. शुक्रवारी पोलिसांनी मुंबईच्या अंधेरी येथील अक्षय मित्तल इंडस्ट्रीयल इस्टेट-मरोल येथील कार्यालयावर छापा टाकला.