नॅपकिन विकणाऱ्या महिलेला मारहाण; दोन वर्षांत एकही पाकीट विकले नाही

सॅनिटरी नॅपकिन उद्योगांच्या वाटेत अंधश्रद्धेने अडथळे उभे केले आहेत. नॅपकिनची निर्मिती म्हणजे पाप आहे, अशा बुरसटलेल्या पुरातनवादी विचारांमुळे  जेमतेम १२ टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा उपयोग करतात. सरकारच्या लेखी हा आकडा १५ टक्के आहे. हा सरकारी आकडा खरा मानला तरी तरी ८५ टक्के महिला अद्यापही सॅनिटरी नॅपकिन वापरत नाहीत, हे वास्तव आहे. शिवाय अशा उद्योगाला समाजमान्यता मिळणे कठीण जाते. काहींनी हा प्रयत्न केला तर लोकांनी त्यांना मारहाण केली. दोन वर्षांत एकही पाकीट विकले नाही, असेही अनुभव आहेत. त्यामुळे महिला बचत गटांसह इतरही ग्रामीण उद्योजक या व्यवसायात पडायला धजावत नाहीत.

या उद्योगात बहुराष्ट्रीय कंपन्या मोठय़ा संख्येने आहेत. त्या तुलनेत महिला बचत गटांची संख्या अगदीच नगण्य आहे. नागपुरातील अनेक शाळा महाविद्यालयांतून ‘मासिक पाळीच्या काळात घ्यावयाची काळजी’ या विषयांवर कार्यक्रम घेतले जातात. मात्र, नेमके कोणते नॅपकिन चांगले, त्यामुळे आरोग्याला हानी किंवा काही लाभ होतात का? त्यासाठी वापरले जाणारे साहित्य, वापरून झाल्यावर त्याची विल्हेवाट कशी लावायची, अशा अनेक गोष्टींवर चर्चा होते, पण त्याचे अपेक्षित परिणाम मात्र दिसत नाही. अनेक महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठाच्या एका विभागात वेंडिंग मशीन आणि डिस्पोजल मशीन लावले आहे. धनवटे नॅशनल महाविद्यालय, मोहता विज्ञान महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालय, नंदनवनचे महिला महाविद्यालय अशा काही मोजक्या महाविद्यालयांमध्येही अशा मशीन्स आहेत. त्याचा लाभ घेणाऱ्या महिलांची संख्या आता कुठे वाढताना दिसत आहे. हा एक सकारात्मक बदल आहे. मात्र, सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करणाऱ्या उद्योगांचे विचाराल तर स्थिती खूपच गंभीर आहे.

विद्यापीठ परिसरात विधायक प्रारंभ

आमच्या केंद्रावर सॅनिटरी नॅपकिनसाठी येणाऱ्या मुली, महिला प्राध्यापकांची संख्या वाढली आहे. विद्यापीठ कॅम्पसमध्ये फक्त आमच्याच विभागात ‘वेंडिंग आणि ‘डिस्पोजल’ मशीन लावण्यात आल्या आहे. मशीनमध्ये ५० नॅपकिन बसतात. पाच रुपयाचे नाणे टाकल्यावर एक नॅपकिन बाहेर येते. कुणी एक रुपयाचे नाणे टाकले तर चार रुपये बाकी असल्याचे मशीनच सांगते. सॅनिटरी नॅपकिनची गुणवत्ताही पहावी लागते आणि वापरल्याशिवाय ती कळत नाही. एक-दोन कंपन्यांचे नॅपकिन सुरुवातीला मशीनमध्ये टाकल्यावर त्यांची गुणवत्ता चांगली नसल्याचे लक्षात आले. आता थोडे महागडे नॅपकिन घेतले आहे. सात रुपयांना एक नॅपकिन पडते.

– छाया खोब्रागडे, कर्मचारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अध्यासन.

‘कंडोम’ मोफत,‘नॅपकिन’ का नाही?

पाच वर्षांपूर्वी पारधेवाडीत ९७ टक्के पुरुषांना ‘कंडोम’ माहिती होते. मात्र, एक टक्के महिलांनाही सॅनिटरी नॅपकिनची माहिती नव्हती. नॅपकिन तयार करायला सुरुवात केली तेव्हा अक्षरश: लोकांनी मला मारले. दोन वर्षे तर एकही पाकीट विकले गेले नाही. अंधश्रद्धा हे त्यामागील कारण आहे. सरकारी दवाखान्यात कंडोम मोफत दिले जातात, तर सॅनिटरी नॅपकिन का नाही? कंडोमही परदेशी कंपनीचेच आहेत. त्याला करामध्ये सूट दिली जाते तशी सॅनिटरी नॅपकिनला का नाही? ‘जीएसटी’ला विरोध करण्यासाठी प्रारंभी आंदोलन केले. आता गावात ३८ मुली आहेत आणि त्या सर्व सॅनिटरी नॅपकिन वापरतात. ते बनवण्याच्या क्षेत्रात महिलांना प्रचंड रोजगार आहे. माझ्या युनिटला सात हजार लोकांनी भेट दिली आहे. मात्र, एकानेही नवीन युनिट उभारले नाही.

– छाया काकडे, सचिव, विचारधारा ग्रामीण विकास संस्था, पारधेवाडी

उद्योग तसा फायद्याचाच

सॅनिटरी नॅपकिन वातावरण प्रदूषित करीत नाही. त्याची विल्हेवाट सोप्या आणि योग्य पद्धतीने लावता येते. कारण त्यात कापूस व लाकडाचा लगदा असतो. त्यामुळे शहरी असो की ग्रामीण भाग असो महिलांना मोठय़ा प्रमाणात रोजगार देऊ शकणारा हा व्यवसाय आहे.  प्रत्येक युनिटमागे ४००० पॅकेटस्चे उत्पादन होऊ शकते. त्यातून एका ‘शिफ्ट’मध्ये सहा ते १० महिलांना थेट रोजगार मिळू शकतो. शिवाय मार्केटिंग करणाऱ्या महिला वेगळ्या. या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता व उद्योजक छाया काकडे काही दिवसांपूर्वी सॅनिटरी नॅपकिनच्या ‘डेमो’साठी नागपुरात आल्या होत्या. त्यांनी एक युनिट पारधेवाडीत सुरू केले आहे. त्यातून  महिलांना रोजगार मिळाला आहे.