विदर्भ मूर्तिकला संघटनेचे पदाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांची खंत; लोकसत्ता कार्यालयाला सदिच्छा भेट

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीवर सरकार आणि स्थानिक महापालिका प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे पारंपरिक मूर्तिकारांना त्याचा मोठा फटका बसला आहे. नवीन मूर्तिकारांची मानसिकता कमी वेळात जास्त पैसा कमावण्याची असल्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कुंभार किंवा मूर्तिकारांचा हा व्यवसाय धोक्यात येऊ शकतो, असे मत ज्येष्ठ मूर्तिकार आणि विदर्भ मूर्तिकला संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी प्रमोद सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

लोकसत्ता कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी सूर्यवंशी बोलत होते. ते म्हणाले, शहरात चार ते पाच लाख गणेश मूर्तीची आवश्यकता आहे आणि त्या प्रमाणात मातीच्या मूर्ती तयार करणारे पारंपरिक मूर्तिकार आणि कुंभारही आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांत जास्त पैसा आणि कमी मेहनत असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार करणारे शहराच्या बाहेरून मोठय़ा प्रमाणात येथे आल्यामुळे त्याचा परिणाम पारंपरिक व्यवसायावर झाला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो असे केवळ बोलले जाते. मात्र, सरकारच त्याला प्रोत्साहन देत आहे. सरकारचे आणि स्थानिक प्रशासनाचे त्यावर कुठलेही नियंत्रण नाही.

गणेशोत्सवाच्या काळात ८ ते १० फुटाच्या प्लास्टार ऑफ पॅरिसच्या मूर्ती बाजारात विक्रीला आल्या आहेत. मात्र, अशा भव्य मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था महापालिकेकडे  नाही. ८ फूट प्लास्टार ऑफ पॅरिसची मूर्ती १५ हजार तर तेवढीच मातीची मूर्ती ४० ते ४५ हजार रुपयाला मिळत असल्यामुळे लोक स्वस्त असलेली मूर्ती खरेदी करतात. मूर्तिकार संघटनेने या संदर्भात महापालिका आणि राज्य सरकारला अनेक निवेदने दिली मात्र, त्यावर काहीच तोडगा काढला जात नाही. मातीपासून तयार करणाऱ्या पारंपरिक मूर्तिकारांचा व्यवसाय संपवण्याचा सरकारचा विचार आहे की काय, अशी शंका आता वाटायला लागली आहे. त्यामुळे पारंपरिक मूर्तिकारांची नवीन पिढी या व्यवसायात येऊ पाहत नाही. यापूर्वी कुंभार समाजाच्या संघटनेने महापालिका प्रशासनाकडे निवेदन दिले होते, आंदोलनही केले होते. मात्र, त्याचा काही परिणाम झाला नाही. एकीकडे प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो अशी ओरड करायची, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी सरकारी आदेश काढायचे. मात्र त्यावर अंमलबजावणी करायची नाही, अशी सरकारची भूमिका आहे असेही सूर्यवंशी म्हणाले.

प्रशिक्षणासाठी शासकीय व्यवस्था नाही

पारंपरिक मूर्तिकाराच्या कुटुंबातील सदस्य घरातील ज्येष्ठ लोकांचे अनुकरण करून या क्षेत्रात शिकण्याचा प्रयत्न करतात मात्र, ज्यांना ही कला शिकायची आहे, अशा नव्या पिढीतील युवकांसाठी मात्र प्रशिक्षणाची कुठलीही सोय नाही. विविध चित्रकला कला महाविद्यालयातून देण्यात येणारे शिक्षण केवळ पदवी मिळवण्यासाठी आहे. मात्र त्यातून मूर्तिकार तयार होत नाही. मातीच्या मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे कष्ट  करण्याची तयारी नाही.

म्हणून चितारओळ सोडली नाही

चितारओळ ही पूर्वी केवळ पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या काही विशिष्ट मूर्तिकारांच्या नावाने ओळखली जात होती. त्यामुळे या चितारओळीला भोसलेकालीन वैभव होते. गणेशोत्सव, देवी उत्सव, रामनवमी शोभायात्रा, जन्माष्टमी या सणाच्या निमित्ताने केवळ नागपूरचेच नाही तर बाहेरील लोक खास मूर्ती पाहण्यासाठी येत होते. आता जुन्या मूर्तिकारांची संख्या कमी झाली आहे आणि ज्यांना केवळ व्यवसाय करायचा आहे, असे बाहेरील लोक येऊन बसले आहेत. जुन्या लोकांनी या कलेकडे कधीच व्यवसाय म्हणून बघितले नाही तर कला जोपासावी, या दृष्टीने प्रयत्न केले. आता चितारओळीमध्ये जागेचा अभाव बघता गांधीबाग परिसरात मूर्तिकारांना जागा देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, त्या ठिकाणी गेले असते तर या परिसराचे वैभव संपले असते. ते होऊ नये म्हणून तो प्रस्ताव नाकारला.