महेश बोकडे

पाश्चिमात्य देशांत मात्र उत्तम प्रतिसाद

उपराजधानीत विविध व्यायामशाळांसह जिमची संख्या दिवसागणिक वाढत आहे, परंतु पाश्चिमात्य देशांप्रमाणे आजही उपराजधानीत लहान मुलांच्या हक्काचे एकही स्वतंत्र जिम नाही. लहान वयात जिम लावल्यास मुलाची उंची कमी होते, असे अनेक  गैरसमज सामान्यांमध्ये आहेत. त्यामुळे पालक लहान मुलांना जिममध्ये पाठवायला तयार नाहीत.

उपराजधानीतील नागरिक आरोग्याप्रती जागरूक होत आहेत. त्यामुळे शहरात लहान स्वरूपाचे सुमारे २५० आणि मोठय़ा स्वरूपाचे २५ ते ३० जिम आहेत.  जिममध्ये जाणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. वृद्धांचाही यात समावेश आहे, परंतु एक ते १३ वर्षे वयोगटातील मुलांची संख्या जवळपास नगण्यच आहे. पश्चिमात्य देशामध्ये मुलांचे जिम (चिल्ड्रेन जिम) ही संकल्पना चांगलीच रुजली आहे. तेथे मुलांना खेळ, नृत्य, योगा या साऱ्या गोष्टींच्या माध्यमातून शरीरासह मानसिक आरोग्य सुदृढ करण्याचे प्रयत्न केले जातात. येथे मुलांमध्ये विविध खेळांप्रती आवड निर्माण केली जाते. त्यासाठी त्यांना पारितोषिकही दिले जातात. या जिममध्ये प्रशिक्षित प्रशिक्षक असतात. हे प्रशिक्षक प्रत्येक मुलाच्या खेळ व व्यायामावर विशेष लक्ष ठेवतात. त्यात काही चुका दिसताच त्या सुधारल्या जातात. जिमच्या माध्यमातून मुलांना विविध क्रीडा प्रकारात प्रशिक्षित केले जाते. चिनमध्येही लहान वयापासूनच मुलांना ऑलिम्पिकसह इतरही जागतिक स्पर्धेतील विविध क्रीडा प्रकाराचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे पुढे त्या देशात चांगले क्रीडापटू तयार होतात. मात्र, भारतासह नागपुरात अद्यापही लहान मुलांचे जिम ही संकल्पना रुजू शकलेली नाही. उपराजधानीतील  मुलांना शालेय स्तरावर योगासह काही क्रीडा प्रकार शिकवले जात असले तरी पाश्चिमात्य देशातील जिमच्या तुलनेत ते कमी आहेत.

असे आहेत समज-गैरसमज

जिममध्ये वजन उचलल्यामुळे लहान मुलांच्या हाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊन त्यांची उंची खुंटते, असा गैरसमज आहे. परंतु न्यूझीलंडमधील युनिव्हर्सिटी ऑफ ऑकलंड येथे झालेल्या संशोधनात जी मुले लहानपणी वजन उचलण्याचा व्यायाम करतात, त्यांची हाडे सशक्त होत असल्याचे पुढे आले आहे.

चिल्ड्रेन जिममधील व्यायाम

* धावणे

* उडय़ा मारणे

* मैदानी खेळ

* नृत्य

* योगा

* उठक-बैठक

* हलके वजन उचलणे