27 May 2020

News Flash

वाहतूक कोंडीमुळे नवीन नागपूर भागातील नागरिकांच्या नाकीनऊ

काही अंतर पुढे गेल्यानंतर सुयोगनगर ते रामेश्वरी रिंग रोड चौकादरम्यान रिंगरोडच्या एका बाजूचे बांधकाम सुरू आहे.

रामेश्वरी रिंग रोड ते बेलतरोडी मार्गावरील वाहतूक कोंडी.

मंगेश राऊत

नोकरीच्या ठिकाणी पोहोचायला लागतात दोन तास; वाहतूक नियमांचे उल्लंघन, विकासकामे, अतिक्रमणाचा फटका

नवीन नागपूर म्हणून उदयास आलेल्या बेसा, बेलतरोडी, मनीषनगर भागातील लोकांना शहरात नोकरीसाठी येणे व सायंकाळी घरी परतणे म्हणजे एकप्रकारे दिव्य कार्य होऊन बसले आहे. वाहतूक कोंडीमुळे या भागातून शहरात दाखल होणे व परतण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास लागत असून लोकांना आतापासून मुंबईसारख्या कठीण प्रवासाचा अनुभव येऊ लागला आहे.

उपराजधानीतील जमिनीचे दर गगनाला भिडल्याने शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावखेडय़ांना मेट्रो रिजनमध्ये समाविष्ट करण्यात आले. लोक शहरापेक्षा काही अंतरावरील ठिकाणी घर बांधण्यास प्राधान्य देऊ लागले. त्यामुळेच बेसा, बेलतरोडी आणि मनीषनगर परिसरात झपाटय़ाने विकास झाला. २००८ ते २०१८ या दरम्यान या भागात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. शहरातील नोकरदार वर्गालाही या परिसराने भुरळ घातली आहे. बघता बघता येथे नवीन नागपूर उदयास आले. आठवडी बाजार, सुपरबाजार, बँक, मल्टिप्लेक्स, बार, रेस्टॉरेंट आदी सुविधा परिसरात उपलब्ध आहेत. शहरात नोकरी करणारा मोठा वर्ग आता या नवीन नागपुरात राहू लागला आहे. पण, परिसरातील अरुंद रस्ते, रस्त्यांवरील बाजार आणि नियोजनाच्या अभावामुळे या परिसराला आतापासूनच वाहतूक कोंडीची समस्या भेडसावू लागली आहे. परिसरातील वाहतूक कोंडीचा अनुभव घेण्यासाठी लोकसत्ताच्या प्रतिनिधीने सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजता सिव्हिल लाईन्स परिसरातून दुचाकीने प्रवास सुरू केला. त्यादरम्यान सिव्हिल लाईन्स ते नरेंद्रनगर या मार्गावर रहाटे कॉलनी परिसरातून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. त्यानंतर नरेंद्रनगर चौकाकडून रामेश्वरी रिंग रोड चौकाकडे जात असताना नरेंद्रनगर पुलाच्या पूर्वी पडणाऱ्या छत्रपती सभागृहाच्या परिसरातही काही काळ वाहतूक अवरुद्ध होती. याबाबत परिसरातील ऑम्लेट विक्रेता सुनील सातार याला विचारल्यावर तो म्हणाला, दररोज सायंकाळी ६ ते ८ दरम्यान या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असते.

काही अंतर पुढे गेल्यानंतर सुयोगनगर ते रामेश्वरी रिंग रोड चौकादरम्यान रिंगरोडच्या एका बाजूचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे दुसऱ्या बाजूने दुतर्फा वाहतूक होत असून वाहनचालक लवकर समोर निघण्याच्या घाईने रस्ता अडवून होते. या चौकात वाहतूक पोलिसांची चौकी असल्याने पोलीस चौकात उभे राहून वाहतूक व्यवस्था हाताळत होते. पण, लोकांना घरी पोहोचण्याची घाई असल्याने ते वाहतूक पोलिसांना जुमानत नव्हते.

रामेश्वरी चौकातून बेलतरोडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चौकापासून काही अंतरावरच रस्ता निमुळता (बॉटल नेक) होतो. त्या ठिकाणी एकाने रस्त्याच्या कडेला कार उभी केल्याने

सर्व वाहने बराच वेळ अडकली होती. बेलतरोडी ते मनीषनगर आणि मनीषनगर ते सोमलवाडा दरम्यानच्या रस्त्यावर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू असल्याने तेथेही वाहनांची कोंडी होते.

वाहतूक पोलीस चुकीच्या दिशेला

रहाटे कॉलनी परिसरात पेट्रोल पंप आणि कारागृह मार्गावर खासगी बसचे थांबे आहेत. राज्य परिवहन महामंडळासह खासगी प्रवासी वाहने चौकापासून २० ते ५० मीटर अंतरावर उभ्या राहतात. त्यामुळे वर्धा मार्ग व काँग्रेसनगर मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण होते. पण, वाहतूक पोलीस जनता चौकाच्या दिशेने झाडाखाली उभे राहतात व विरुद्ध दिशेला होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करीत असतात. मेट्रो रेल्वेच्या कामामुळे छत्रपती सभागृह ते नरेंद्रनगर पुलाच्या दरम्यान नियमित वाहतूक कोंडी होते. पण, सायंकाळी तेथे वाहतूक पोलीस किंवा मेट्रोचे स्वयंसेवक कोणीच नसते. रामेश्वरी रिंगरोड चौकात वाहतूक पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडते. तर रामेश्वरी रिंगरोड चौक ते बेलतरोडी आणि बेलतरोडी-मनीषनगर-सोमलवाडा या परिसरातील रस्त्यांवर एकही वाहतूक पोलीस तैनात नाही, हे विशेष.

नवीन नागपूर परिसरात राहणारे बहुतांश लोक हे नोकरदार आहेत. येथील ७० टक्के लोकांच्या घरी कार आहे. परिसरातील रस्ते आधीच अरुंद असताना रस्त्याच्या कडेला भाजी विक्रेते व हातठेले मोठय़ा प्रमाणात उभे दिसतात. शिवाय कारने प्रवास करताना वाहतूक कोंडीची समस्या अधिक भेडसावते. पोलीसही परिसरातील रस्त्याच्या कडेला दुकान थाटणाऱ्यांवर कोणतीच कारवाई करीत नाही. सिव्हिल लाईन्सपासून दुचाकीने घरापर्यंत पोहोचण्यासाठी दररोज पाऊण तास लागतो. कार चालकास यापेक्षा अधिक वेळ लागतो.

– रिना तायडे, टपाल विभागातील कर्मचारी, रा. बेलतरोडी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 28, 2018 1:24 am

Web Title: due to traffic congestion people of nagpur are stress
Next Stories
1 ..आणि १०८ चिमुकल्यांचे मूकबधीरत्त्व टळले
2 ९९ वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन नागपुरात
3 लोकजागर : काँग्रेस, कन्हैय्या  अन् कुचराई!
Just Now!
X