खिडक्यांची काचे फोडून प्रवासी बाहेर पडले

नागपूर-मुंबई दुरान्तो एक्स्प्रेसला झालेल्या अपघातातून बचावलेल्या नागपूरकर प्रवाशांनी सांगितलेले अनुभव धक्कादायक आहेत. केवळ दैव बलवत्तर म्हणून प्रवासी बचावले. चालकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे प्राणहानी टळली अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, अशी प्रतिक्रिया या प्रवाशांनी व्यक्त केली.

अपघातग्रस्त दुरोन्तोने प्रवास करणाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना अपघाताचा थरार सांगितला. काळ आला होता, पण वेळ आली नव्हती. म्हणून आम्ही बचावलो, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या ‘दुरान्तो एक्सप्रेस’ला झालेल्या अपघातात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी अपघातग्रस्त रुळावरून घसरलेल्या रेल्वेडब्यातील प्रवासी अक्षरश: मृत्यूच्या दारातून बाहेर आल्याचा अनुभव आला.

नागपूरहून सुटलेल्या व मुंबईला जाणाऱ्या दुरान्तोमध्ये नागपूरकर प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. त्यात आजी-माजी आमदारांसह सामान्य नागरिकांचाही समावेश होता. अपघात झाल्यावर सर्वानी परस्परांना मदतीचा हात देऊन कसारा घाट आणि जंगलातून महामार्गापर्यंतचा प्रवास सुखरूप पूर्ण केला.

दुरान्तोला अपघात झाल्याचे कळल्यानंतर नागपुरातील नातेवाईकांनी गाडीतील प्रवाशांसी संपर्क साधला. किरकोळ जखमी पण सुखरूप असल्याचे कळल्यावर त्यांचा जीव भांडय़ात पडला, मात्र अपघाताच्यावेळी अनुभवलेला थरार पुनर्जन्माची आठवण करून देणारा होता.

आसनगाव आणि वासिंद स्थानकादरम्यान खूप पाऊस झाल्यामुळे दरड कोसळली. त्यामुळे रुळाखालील गिट्टी वाहून गेली. ही बाब इंजिन चालकाच्या लक्षात येताच त्याने आपत्कालीन ब्रेक लावले आणि मोठा अपघात टळला, परंतु इंजिनशिवाय एएलआर, एच१, ए१, ए२, ए३, बी१, बी२, बी३, बी४ हे डबे घसरले आणि काही प्रवासी बर्थवरून पडून किरकोळ जखमी झाले.

डब्यांच्या पायऱ्यांपर्यंत चिखल

मी, पत्नी आणि मुलगी बी-२ डब्यातून प्रवास करीत होतो. आम्ही झोपेतच होतो. अचानक धक्का बसला. माझी पत्नी बर्थवरून पडली. मी जागा झालो. इकडे-तिकडे बघू लागलो. प्रवेशदारात जाऊन बाहेर बघितले. तेव्हा कळले की, इंजिनपासूनचे सर्व वातानुकूलित डबे रुळावरून घसरले आहेत. काही डबे रुळाच्या डाव्या बाजूला तर काही उजब्या बाजूला घसरले होते. डोंगरातून मोठय़ा प्रमाणात रुळावर दरड कोसळली होती. काही ठिकाणी रेल्वेडब्याच्या पायऱ्यापर्यंत चिखल आला होता. पावसाचे वातावरण आणि रुळावरील चिखल बघून घसरलेली गाडी कोणाच्या बाजूने कलंडेल. याचा काही नेम नाही. त्यामुळे प्रवासी जसे जमेल तसे खाली उतरून परिसर सोडण्याच्या प्रयत्नात होते. घटनास्थळापासून सुमारे अडीच किलोमीटर आसनगाव स्थानक आहे. प्रवासी तेथपर्यंत आले आणि तेथून आपापल्या सोयीने मुंबईकडे रवाना झाले. रेल्वेच्या मदत व बचाव कार्याची प्रवाशांनी वाट पाहिली नाही.

अमित रामटेके, पत्रकार, नागपूर

डब्याच्या एकीकडे वीजतार, दुसरीकडे खड्डा

आम्ही जागेच होतो. कुणाल वॉशरूममधून येऊन बर्थवर बसला होता. मुंबईला गाडी पोहोचण्याआधी कार चालकाला फोन लावा, असे मी त्याला सांगत होते. त्याच सुमारास डब्याला जोरदार धक्का बसला आणि डबा डाव्या बाजूला कलंडला. त्यामुळे कुणाल खाली पडला. मी लागलीच त्याच्या मदतीला धावल्यामुळे त्याच्या डोक्याला दुखापत झाली नाही, परंतु कंबर आणि पाठीच्या भागाला मार लागला आहे. ही घटना सकाळी ६.२५ च्या सुमारास घडली. इंजिनच्याजवळील एच-१ डबा आडवा झाल्याने तो आमच्या डब्यावर धडकला. आमचा डब्याचा काही भाग चेपला आणि डाव्या बाजूला कलंडला. रेल्वेडब्याची डावी बाजू खाली आणि उजवी बाजू वर अशी अवस्था होती. डाव्या बाजूला झुकलेल्या डब्यात आम्ही सुमारे ३० ते ४० मिनिटे होते. तेथून निघण्याचा प्रयत्न करीत होतो. एका प्रवेशद्वारापुढे विद्युत तारा, तर दुसऱ्या प्रवेशद्वारापुढे खड्डा होता. डब्यातून बाहेर निघायचे कसे, या विवंचनेत असताना प्रवाशांनी शिडीची व्यवस्था केली. ज्या बाजूला डबा कलंडला त्याच्या विरुद्ध बाजूला प्रवेशद्वारावर शिडी लावून एकेक करून आम्ही बाहेर पडलो. पाऊस सुरू होता. अपघातग्रस्त स्थळ जंगलाचा आणि घाटाचा भाग होता. रेल्वेचे बचाव व मदत पथक अद्याप पोहचले नव्हते. त्यामुळे आम्ही सामान, बॅगा घेऊन जंगलातून चालू लागलो. सुमारे एका तासाने वाहतूक पोलीस आले. त्यांना विनंती केली आणि नाशिक-मुंबई महामार्गापर्यंत सोडून देण्याची विनंती केली. तेथून पुढे मुंबईत पोहचले. सुमारे साडेतीन वाजताच्या सुमारास कुणालला रुग्णालयात दाखल केले.

दीक्षा नितीन राऊत, नागपूर 

तर मोठा अनर्थ झाला असता..

डाव्या बाजूला दरी आणि समोर काही अंतरावर उजव्या बाजुला नदी.. रात्रभर पाऊस पडल्याने रुळावर दरड कोसळली आणि रुळाखालील गिट्टी वाहून गेली. सकाळची वेळ असल्याने हे चालकाच्या लक्षात आले व त्याने आपातकालीन ब्रेक लावले. अन्यथा संपूर्ण रेल्वे गाडी नदीत कोसळून मोठा अनर्थ झाला असता. रेल्वे इंजिन चालकामुळे वाचलो. त्याने ब्रेक लावले नसते तर काय झाले असते याची कल्पनाच अंगावर शहारे आणते. पुढे नदी होती. अपघात झाला तेव्हा मी जागा होतो. मी ए१-बोगीत ३७ क्रमांकाच्या बर्थवर बसलो होतो. रेल्बेडब्याला जोरदार धक्का बसला. आधी काय झाले कळलेच नाही. रेल्वे डबा रुळावर उतरल्याचे लक्षात आले आणि रेल्वेडब्यातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न सुरू होते. परंतु प्रवेशद्वारातून निघता येत नव्हते. त्यामुळे मी खिडकीचे काच फोडले आणि तेथून मी स्वत: आणि इतर प्रवाशांना बाहेर काढले. तोपर्यंत पोलीस किंवा रेल्वे प्रशासन घटनास्थळी पोहचले नव्हते. डब्यातून सर्व प्रवासी निघाल्यानंतर मी आपली बॅग घेऊन पायी निघालो. रिझझिम पाऊस येते होते. साधारणत: २ किलोमीटर अंतर पायी चालल्यानंतर पोलिसांची गाडी दिसली. त्यांना विनंती केली, त्यांनी महामार्गापर्यंत सोडून दिले. तेथून एक जीप भाडय़ाने घेऊन मुंबईत सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास पोहचलो.

आशीष जयस्वाल, शिवसेना नेते व  माजी आमदार, रामटेक 

मदतीस विलंब

रेल्वे अपघात झाल्यानंतर मदत व बचाव कार्य ज्या गतीने मिळणे अपेक्षित होते, ते मिळाले नाही. तब्बल दोन तासांनी रेल्वेचे मदतकार्य सुरू झाले. दुर्गम भाग आणि रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने प्रवासी कावरेबावरे झाले होते. प्रवाशांनाच एकमेकांचा आधार होता. सुमारे दोन तासांनी मदत पथक आले. दुरान्तो सीएसटीपर्यंत आहे तर प्रवाशांना मात्र कल्याणपर्यंत सोडून देण्यात आले.

जस्टीन जोसेफ राव, पत्रकार