लालबागचा राजाच्या दर्शनासाठी गेलेले उजवणे बंधू सुखरूप

रेल्वेने अनेकदा प्रवास केला. मात्र, मंगळवारी सकाळी अनुभवलेला अपघाताचा थरार बघता केवळ विघ्नहर्त्यांमुळेच बचावलो, असे म्हणता येईल, असे संघ कार्यालय परिसरात राहणारे व अपघातग्रस्त दुरोंतोने प्रवास करणारे राजू आणि मनीष उजवणे या दोन भावंडांनी सांगितले. ते दोघेही सुखरूप आहेत. मुंबईतील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी महालमधील राजू आणि मनीष उजवणे हे दोघे भाऊ सोमवारी रात्री दुरोंतोने मुंबईला निघाले. मनीष उजवणे ‘ए-वन’ कोचमध्ये होते. रात्रीचा प्रवास झोपेत झाला. मुंबई जवळ आल्याने सकाळी उठून तयारी सुरू केली. तेवढय़ात जोरदार आवाज झाला. काय होते कळायच्याआतच बोगी उलटली. मागची बोगी पुढे आली. लोकांच्या ओरडण्याचा आवाज आला. प्रवाशी एकमेकांच्या अंगावर आदळले. प्रत्येकजण जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होते. बोगीच्या दारापासूनच उच्चदाब वीज वाहिनी होती. पोलिसांनी तेथून उतरू नका असे सांगितले. त्यामुळे खिडकीची काच फोडली आणि कसेबसे बाहेर पडलो. त्यानंतर एक एक करीत बोगीतील इतर प्रवाशांना बाहेर काढले. अनेकांचे सामान आत होते. थोडय़ावेळाने वीज वाहिनी तोडण्यात आली. त्यानंतर सामान बाहेर काढले. बाजूच्या कोचमधील प्रवासी आत फसले होते, त्यात एक वृद्ध महिलाही होती, असे मनीष उजवणे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले. विघ्नहर्त्यांच्या कृपेमुळेच बचावलो असे ते म्हणाले.

राजू उजवणे म्हणाले, बाथरूमध्ये गेलो असता बोगी उलटली. त्यामुळे तेथेच अडकून पडलो. आरडा-ओरड केल्यावर एका व्यक्तीने दरवाजा उघडला. बाहेर आल्यावर सर्वत्र  हाहा:कार पसरला होता. अपघातानंतर अर्धा तास रेल्वे प्रशासनाची कुठलीही मदत पोहोचली नव्हती. प्रवाशांनीच परस्परांना मदत केली. डोळ्यापुढे अपघाताचे चित्र आल्यास अजूनही अंगावर शहारे येतात. घटनास्थळाहून ४ किमी आसनगावला पायी निघालो. खासगी गाडीने प्रवास करीत मुंबईला पोहोचलो.