शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रुग्ण जास्त

शहराच्या तुलनेत ग्रामीणला लहान मुलांमध्ये अतिसारासह गॅस्ट्रो हा आजार वाढत आहे. नागपूर जिल्ह्य़ातील प्रत्येक पालकांनी योग्य काळजी घेतल्यास हा आजार टाळणे शक्य आहे, परंतु त्याकरिता पालकांनी आपल्या मुलांना रोज पिण्याकरिता शुद्ध पाण्यासह शुद्ध अन्नही द्यायला हवे. मुलांच्या शारीरिक स्वच्छतेकडेही विशेष लक्ष दिल्यास आजार टाळता येतो. जिल्ह्य़ातील सगळ्या शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये हल्ली रोज शंभरावर रुग्ण अतिसार व गॅस्ट्रो सदृश्य आजाराचे रुग्ण आढळतात. खासगीच्या नोंदी आरोग्य विभागाकडे नसतात, हे विशेष.

नागपूर जिल्ह्य़ाची भौगोलिक स्थिती बघितली तर पावसाळ्यात काही विषाणू किंवा जिवाणूचा प्रादुर्भाव येथे जास्त असतो. त्यामुळे वातावरणातील दूषितपणामुळे अतिसार व गॅस्ट्रो सदृश्य आजार संभवतात. लहान मुलांत कमी प्रतिकार शक्ती असल्याने त्यांना हा आजार जास्त होतो. दिवसात पाचपेक्षा जास्त शौचास होणे, सोबतच दैनंदिन होणाऱ्या शौचात पातळपणा असणे, शौचासची संख्या नेहमीपेक्षा वाढणे ही अतिसाराचीच लक्षणे आहे. अतिसाराचा त्रास चौदा दिवसाहून अधिक असल्यास त्याला क्रॉनिक अतिसारही म्हणतात. हा आजार लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. मुलांच्या शौचासोबत आव व रक्त जाणे ही अतिसाराचीच लक्षणे आहेत. साधारणत: मुलाच्या आतडीमध्ये पातळ पदार्थाचे शोषण कमी होणे, पातळ पदार्थ जास्त प्रमाणात तयार होत असल्यास वा आतडीमध्ये जास्त वेगाने शौच समोर जात असल्यास ही अतिसाराचीच लक्षणे आहेत. उन्हाळा आणि पावसाळ्यात दूषित पाणी व अन्नाच्या सेवनाने लहान मुलांमध्ये हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. जगात एकूण मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये ९ टक्के वाटा अतिसाराचा असतो.

लक्षणे

  • पातळ शौचास, ओकारी, ताप
  • पोट दुखणे, शौच झाल्यावरही जाण्याची इच्छा होणे
  • लघवीचे प्रमाण कमी होऊन ती गडद रंगाची होणे
  • मोठय़ा मुलांना तहान जास्त लागणे
  • डोके दुखणे, चक्कर आल्यासारखे वाटणे
  • खाण्याची इच्छा कमी होणे
  • शौचासोबत रक्त आणि आव येणे
  • आजाराची तीव्रता जास्त असल्यास वजन कमी होणे
  • कधी-कधी झटके सुद्धा येऊ शकतात
  • तोंड, जिभेसह त्वचा शुष्क होणे
  • मुलाच्या नाळीची गती व हृदयाचे ठोके वाढणे

उपचार

  • जलसंजीवनी (ओआरएस)द्वारे शुष्कतेचे उपचार केले जातात
  • साखर-मीठ पाण्यापासून घरीच जलसंजीवनी करून रुग्णावर उपचार शक्य आहे
  • नारळाचे पाणी, भात व वरणाचे पाणी, सूप, दही, ताक रुग्णाला देणे
  • रुग्णाला मसालेदार, तिखट, आंबट, स्निग्ध पदार्थ न देता साधेच जेवण द्यावे
  • आजारात तीव्रता जास्त असल्यास त्वरित रुग्णालयात दाखल करून उपचार करावा

स्वच्छता राखा, आजार टाळा

अतिसार व गॅस्ट्रो सदृश्य आजार टाळण्याकरिता पालकांनी मुलाच्या वैयक्तिक स्वच्छतेसोबत परिसर स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्याकरिता जेवणाआधी व शौचास गेल्यावर हात साबणाने स्वच्छ धुवावे, जेवण बनवणाऱ्या वा भरवणाऱ्या व्यक्तीने स्वत:चे हात स्वच्छ धुवावे, आजारी व्यक्तीने जेवण करू नये, बाळाला पहिले सहा महिने आईचे दूधच द्यावे, काही लसीकरण जसे की ‘रोटा व्हायरस, टायफाईड’ सारख्या लसी शक्य झाल्यास बाळाला द्याव्या.

डॉ. सी.एम. बोकडे, विभाग प्रमुख, बालरोग विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), नागपूर