शहरात माफक दरात भाडय़ाने सायकली

महेश बोकडे, नागपूर</strong>

सायकल चालवणे शारीरिकदृष्टय़ा फायद्याचे असले तरी ती चालवणाऱ्यांची संख्या कमी आहे. ही संख्या वाढवण्यासाठी महामेट्रो आणि बाऊंस शेअर कंपन्यांनी पर्यावरणपूरक सायकल आणली आहे. चेन्नई, बेंगळुरूच्या धर्तीवर अत्यल्प दरात ती भाडय़ाने उपलब्ध केली जात आहे.

नागपुरातही प्रत्येक वर्षी प्रदूषण वाढत आहे. सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेचा वापर वाढवण्यासह पेट्रोल व डिझेलवर चालणाऱ्या वहनांची संख्या कमी करणेच त्यावर उपाय आहे. शहरात नागपूर मेट्रोचे काम वेगाने होत असून ते पूर्ण झाल्यावर नागरिकांना त्याकडे वळवणेही मोठे आव्हान आहे. दुसरीकडे महामेट्रोसह बाऊंस शेअर या कंपन्यांकडून नागरिकांसह पर्यावरणाचे आरोग्य सुधारण्यासाठी शहरात अल्प दरात सायकल भाडय़ाने देऊन कार्बन कमी करण्यासाठीचा नवीन प्रयोग एप्रिल- २०१९ पासून सुरू झाला आहे. त्यासाठी ५०० साध्या पद्धतीच्या तर ५० बॅटरीवर चालणाऱ्या अद्ययावत सायकली शहरात उपलब्ध झाल्या आहेत.

सिमेनरी हिल्स परिसरातील वॉकर्स स्ट्रिीट, लक्ष्मीनगर, के.डी.के. कॉलेज परिसरात सकाळी आणि सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत तर नागपूर मेट्रोच्या ‘बर्डी, एअरपोर्ट, साऊथ एअरपोर्ट, खापरी’ या चारही स्थानकात सकाळी ७ ते रात्री ८ पर्यंत या सायकली उपलब्ध आहेत. त्या महिनाभर नागरिक स्वतच्या घरात ठेवू शकतात. साध्या सायकलींसाठी प्रती माह ३०० रुपये तर बॅटरीवर चालणाऱ्या सायकलींसाठी केवळ ६०० रुपये भाडे मोजावे लागत आहे. ही सायकल भाडय़ाने घेण्यासाठी नागरिकांना स्मार्ट फोनमध्ये बाऊंस शेअरचा अ‍ॅप डाऊनलोड करून ओळखपत्राची प्रत संबंधित कंपनीकडे जमा करावी लागते.

सौर प्रकल्पावर ई-सायकलचे चार्जिग

बाऊंस शेअर कंपनीची जबाबदारी नागपुरात भरतिया ग्रुपकडे आहे. या कंपनीच्या गणेशपेठ कार्यालयातील सौर प्रकल्पावर ही सायकल चार्जिग करण्याची सोय आहे. दोन तास चार्जिग केल्यावर ही सायकल सुमारे २५ किमी चालते. ती घरातही चार्ज करणे शक्य असून त्यासाठी एक युनिटहून कमी वीज लागते. ही सायकल विविध केंद्रावर परत करता येते. एखाद्या केंद्रावर सायकल जास्त झाल्यास ती इतरत्र हलवण्यासाठीही विशिष्ट पद्धतीचे ई-वाहन उपलब्ध करण्यात आले आहे.

सायकलची वैशिष्टय़े

* जीपीएस यंत्रणेमुळे ती कुठे आहे हे त्वरित कळते

* रबरचे टायर-टय़ूब असून ती पंक्चर होत नाही

* समोर आणि मागे विशिष्ट प्रकारचे लाईट्स

* चोरी रोखणारे नटबोल्ट, ते साध्या पाण्याने ऊघडत नाही

* नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानामुळे गंजही लागत नाही.

बेंगळुरू, चेन्नई, हैदराबादसह मेट्रो असलेल्या प्रत्येक शहरात सायकल भाडय़ाने देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. नागपुरातही त्याला चांगला प्रतिसाद आहे. सप्टेंबपर्यंत असाच वाढत राहिल्यास येथे सुमारे दोन हजार सायकली उपलब्ध केल्या जातील.

– निखिल भरतिया, संचालक, भरतिया ग्रुप.