22 September 2020

News Flash

पर्यावरणपूरक कटलरीचा वापर केवळ २० टक्केच!

प्लास्टिकच्या वस्तूंसाठी पर्याय उपलब्ध

पर्यावरणपूरक कटलरी

प्लास्टिकच्या वस्तूंसाठी पर्याय उपलब्ध

नागपूर : प्लास्टिकबंदी झाली, पण प्लास्टिकचा मोह काही सुटेना, अशी नागपूरकरांची अवस्था आहे. प्लास्टिकबंदी म्हणजे केवळ पिशव्या असा समज झाल्याने नागरिकांनी प्लास्टिकला पर्यायी पिशव्या स्वीकारल्या. मात्र, या बंदीत प्लास्टिकचे ताट, वाटय़ा, चमचे, ग्लास, कप आदींचा समावेश आहे. त्याला पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध असताना  या वस्तूंचा केवळ २० टक्के वापर शहरात होत असल्याचे दिसून आले आहे.

खाद्यान्नाच्या उद्योगात देखील प्लास्टिकचा तेवढाच वापर होतो. अगदी पार्सल नेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पिशवीपासून तर त्याचठिकाणी बसून पदार्थाचा आस्वाद घेतल्या जाणाऱ्या प्लेटपर्यंत. दिवसेंदिवस नागपूरकरांची ही खवय्येगिरी वाढत चालली आहे. शहरात अनेक ठिकाणी लागलेल्या फूड स्टॉलवर नजर टाकल्यास या खवय्येगिरीचा अंदाज येतो. त्यामुळे साहजिकच शहरातील प्लास्टिक कचऱ्यात या खवय्यांचीही तेवढीच मोठी भूमिका आहे. संपूर्ण देशाचा विचार केल्यास देशात दरवर्षी १२० अब्ज प्लास्टिकचे चमचे आणि प्लेट वापरल्यानंतर फेकून दिले जातात. त्यामुळे पर्यावरणाचे नुकसान तर होतेच, पण जनावरांच्या पोटात जाऊन त्यांच्या आरोग्यावर तसेच प्लास्टिक प्लेटमध्ये खाल्ल्यामुळे माणसांच्या आरोग्यावरसुद्धा तेवढाच वाईट परिणाम होतो. या प्लास्टिकला पर्याय उपलब्ध नाही असे नाही. केळी आणि पळसाच्या पानावर पूर्वी जेवण दिले जात होते, पण त्यातही पर्यावरणाचा नाश होता. कारण झाडांची पाने तोडली जात होती. मात्र, त्याहूनही अधिक पर्यावरणपूरक पर्याय आता उपलब्ध झाले आहेत. लाकडांच्या कटलरीपासून तर उसाच्या चिपाडांपासून, सुपारीच्या पानांपासून तयार केलेली कटलरी उपराजधानीत उपलब्ध आहे.  झाडांच्या वाळलेल्या आणि गळलेल्या सालीपासून कटलरी तयार केली जाते.  नागपुरात ती तयार होत नसली तरीही विक्रीसाठी येते.

ग्रामायण, बचतगटांसारख्या प्रदर्शनातून त्याची ओळख होत आहे. तरीही अजूनपर्यंत नागपूरकरांनी त्याचा पूर्णपणे स्वीकार केला नाही. एकीकडे मुंबई आणि विशेषकरून पुण्यात या पर्यावरणपूरक साहित्याचा वापर वाढला आहे. मात्र, उपराजधानीत अवघ्या २० टक्क्यांवर आहे. किंमत जास्त असल्याने परवडत नाही, असे खाद्यपदार्थ विक्रेत्यांचे म्हणणे आहे, तर काही नागरिकांकडे घरगुती समारंभात त्याचा वापर हळूहळू वाढत चालला आहे. खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडे त्याच्या वापराचे प्रमाण हे पाच टक्के इतकेच आहे. त्यांच्याकडील  ठेल्यावर पार्सलसाठी प्लास्टिकचा वापर कमीकमी होत आहे. त्यामुळे या पर्यावरणपूरक कटलरीलाही नागपूरकर लवकरच स्वीकारतील, अशी अपेक्षा या क्षेत्रातील पर्यावरण अभ्यासकांना आहे.

बाजरीपासून कटलरी

हैद्राबाद येथील इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इन्स्टिटय़ूटचे माजी वैज्ञानिक नारायण पिसापाने यांनी प्लास्टिक चमचे आणि प्लेटऐवजी पर्यावरणपूरक कटलरी तयार केली आहे. ती बाजरीपासून तयार केली आहे. ती लवकर नष्ट होते आणि धान्यापासून तयार केल्यामुळे  खाताही येते. विशेष म्हणजे, प्लास्टिक आणि लाकडापेक्षा ती स्वस्त असून त्याला वेगवेगळी चव सुद्धा आहे. हैद्राबाद परिसरात ही कटलरी मोठय़ा प्रमाणात वापरली जाते.

ही कटलरी थोडी महाग पडते, त्यामुळे त्याला प्रतिसाद मिळत नाही. मात्र, लोकांनी पर्यावरणाचाही विचार करायला हवा. मुंबई, पुणे, बंगळुरू या शहरात या पर्यावरणपूरक कटलरीची विक्री मोठय़ा प्रमाणात होते. आपल्या शहरातील कॅटरिंग आणि हॉटेल व्यावसायिक  परवडत नसल्याचे कारण पुढे. वास्तविक ही कटलरी प्लास्टिकसारखीच कडक आणि दिसायला चांगली आहे. जनावरांनी खाल्ली तरीही समस्या नाही. गरम पदार्थ त्यात राहू शकतात आणि वापर करून फेकल्यावर त्याचे खत देखील तयार होऊ शकते. प्लास्टिकला खरे तर हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनीही पर्यावरणाचा विचार करून याचा वापर वाढवणे गरजेचे आहे.

– गौरी पाठक, द इकोवर्ल्ड

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 2:12 am

Web Title: eco friendly cutlery use only 20 percent
Next Stories
1 …तर मेघे पितापुत्रांचे पुतळे जाळू; तेली समाजाचा भाजपाला इशारा
2 बुद्धिजीवी शंभर वर्षांचा विचार करतात, राजकारणी पाच वर्षांचा!
3 जखमी वाघाचा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यावर हल्ला
Just Now!
X