‘इकोफ्रेंडली’ विसर्जनाला पर्यावरण क्षेत्रातील अनेक स्वयंसेवी संस्थांची माघार

दुष्काळाच्या गर्तेत तलाव, नद्यांचे पाणीही जेथे आटायला आले आहे तेथे उरलेल्या पाण्याचा वापर सांभाळून करण्याऐवजी गणेशोत्सव, देवी स्थापना काळात मूर्ती विसर्जनाने पाणी आणखी दूषित करण्याचा प्रकार भाविकांकडून केला जातो. म्हणूनच गेल्या काही वर्षांत ‘इको फ्रेंडली’ गणेश विसर्जनाचा पर्याय समोर आला. त्यासाठी महापालिकांनीही पुढाकार घेतला, पण आता ‘इको फ्रेंडली’चे बीज रुजवणारे पर्यावरणवादी आणि महापालिका यांच्या पर्यावरण प्रात्यक्षिकांची धार कमी होत आहे.

त्यामुळे अखेरच्या दिवशी उगवणाऱ्या या स्वयंसेवींचे पर्यावरणप्रेम आणि महापालिकेची पर्यावरणाची भूमिका बेगडी तर नाही ना, अशीही शंका आता व्यक्त केली जात आहे.

नागपूर महापालिकेच्यावतीने दरवर्षी ‘इको फ्रेंडली’ गणपती विसर्जनाकरिता शहरातील पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले जाते. गणेशोत्सवाच्या एक महिना आधीपासूनच या संस्थांना बोलावून बैठका घेतल्या जातात आणि त्यादृष्टीने विसर्जनाची आखणी केली जाते.

मात्र, यावर्षी गणेशोत्सवाच्या अवघ्या काही दिवस आधीपासून बैठक घेतली गेली. विसर्जनासाठी तीन बैठका झाल्या आणि त्यातही पर्यावरणवादी स्वयंसेवी संस्थांची उपस्थिती बोटांवर मोजण्याइतकी होती. त्यातही एक-दोन संस्था वगळता दुसऱ्या दिवशीपासून होणाऱ्या गणेश विसर्जनाला अजूनपर्यंत एकाही स्वयंसेवी संस्थांनी हजेरी लावली नाही. शहरातील फुटाळा तलावावर मोठय़ा प्रमाणावर गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते.

गणेशोत्सव काळात दुसऱ्या दिवशीपासून विसर्जन केले जाते, हे ठाऊक असूनही पर्यावरण क्षेत्रातील एक-दोन स्वयंसेवी संस्था वगळता कुणीही या ‘इकोफ्रेंडली’ विसर्जनासाठी समोर आलेले नाही.

त्याचवेळी ग्रीन विजिल या संस्थेने मात्र फुटाळा तलावाच्या वायुसेनानगरकडच्या बाजूला दुसऱ्या दिवशीपासूनच ठाण मांडले आहे.

या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केलेली कामगिरी अतुलनीय असून त्यांना इतरही स्वयंसेवी संस्थांनी साथ दिली असती, तर कदाचित शहरातील तलावांचे चित्र वेगळे राहिले असते, असे चित्र फुटाळा तलाव आणि शहरातील इतर तलाव पाहिल्यानंतर दिसून येत आहे.

८९८ गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात

गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीपासून तर सातव्या दिवशीपर्यंत फुटाळा तलावाच्या वायुसेनानगर बाजूने झालेल्या विसर्जनात तब्बल ८९८ गणेशमूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावात, तर केवळ २८ गणेशमूर्ती तलावात विसर्जित करण्यात आल्या.

Untitled-36