14 December 2017

News Flash

उच्चशिक्षित महिलेवर बलात्कार

केतन केशव डाखुरे रा. जुना बस स्टॉप, कळमनुरी, हिंगोली, असे आरोपीचे नाव आहे.

खास प्रतिनिधी, नागपूर | Updated: August 12, 2017 2:13 AM

  • अश्लील चित्रफित तयार करून खंडणी मागितली
  • आरोपी पशुवैद्यकचा विद्यार्थी

पीएच.डी.प्राप्त उच्चशिक्षित महिलेवर पशुवैद्यक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांने बलात्कार करून चित्रफितही तयार केल्याचा धक्कादायक प्रकार जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आला.

केतन केशव डाखुरे रा. जुना बस स्टॉप, कळमनुरी, हिंगोली, असे आरोपीचे नाव आहे. सध्या तो नागपुरातील पशुवैद्यक महाविद्यालयात बीव्हीसी अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षांला असून सेमिनरी हिल्स परिसरातील विद्यापीठाच्या वसतिगृहात राहतो. पीडित २८ वर्षीय महिला घटस्फोटीत असून तिला एक सहा वर्षांचा मुलगा आहे. सध्या ती आईवडिलांसोबत जरीपटका परिसरात राहते. घटस्फोटानंतर तिने एमएस्सी व बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएच.डी.प्राप्त केली. तिचे वडील सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी आहेत.

मे २०१७ मध्ये पीडित महिला मावशीसह इटरर्निटी मॉलमधील एका रेस्टॉरेंटमध्ये गेली असता तेथे आरोपी तरुण मित्रासह बसला होता. त्याने महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तिने दुर्लक्ष केले. मॉलमधीलच एका दुकानात कपडे खरेदी करताना तेथे ती कार्ड विसरली. हे कार्ड आरोपीने घेतले व त्यावरील मोबाईल क्रमांकावरून महिलेशी संपर्क साधला. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. काही दिवसांनी ते एकमेकांच्या प्रेमात पडले. ३० मे २०१७ ला तिचे आईवडील पुणे येथे नातेवाईकाकडे गेले असता आरोपी हा तिच्या घरी गेला व तिच्यावर बलात्कार केला. त्याची चित्रफित तयार केली. त्यानंतर आरोपी चित्रफित सार्वजनिक करण्याची धमकी देऊन वारंवार शारीरिक संबंधाची मागणी करीत होता. शिवाय पैसेही मागायला.

एकदा महिलेने आरोपीला ५ हजार रुपये दिले. दरम्यान, आरोपीने नांदेड येथील एक मैत्रीण आणि दुर्गे नावाच्या मित्रासोबत व्हीडिओ कॉन्फरन्सिंगने बोलणे करून दिले आणि त्यांनी व्हीडिओ क्लिप फेसबुकवर न टाकण्यासाठी २ लाखांची मागणी केली.

या प्रकारानंतर पीडित महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून बलात्कार, खंडणी मागणे, जीवे मारण्याची धमकी देणे आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. महाविद्यालयाला सुटय़ा असल्याने पीडित मुलगा हा गावी गेला असून त्याला अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम मुळक यांनी दिली.

नातेवाईकाकडून अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून मामेभावानेच तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत समोर आला आहे. सचिन विश्वनाथ गवई (३०) रा. जितेंद्र प्रसाद सोसायटी, खोडियारनगर, अहमदाबाद असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा आपल्या कुटुंबासह गुजरात राज्यातच राहात असून तो एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. पीडित २३ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह जरीपटका परिसरात भाडय़ाने राहते. ती बी.कॉम. झाली आहे. २०११ मध्ये मोठय़ा बहिणीच्या विवाह सोहोळ्यात आरोपी कुटुंबासह आला होता. तेव्हा या दोघांची ओळख झाली. त्यानंतर तो नेहमी तिच्या संपर्कात होता. एक दिवस त्याने मुलीसमोर लग्न करण्याचा विचार व्यक्त केला. तिनेही त्याला होकार भरला. २०१० मध्ये एक दिवस तो नागपुरात असताना दोघे मानकापूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील सेंट मेरी शाळेजवळील एका नाल्याच्या परिसरात फिरायला गेले. त्या ठिकाणी आरोपीने तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. अशाप्रकारे तो वारंवार नागपुरात येत होता आणि तिच्यावर अत्याचार करीत होता. आता तिने लग्न करण्याची विनंती केली असता आरोपीने नकार दिला. त्यामुळे पीडित मुलीने तक्रार दिली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरेश्वर तुमडाम यांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

First Published on August 12, 2017 2:13 am

Web Title: educated woman raped in nagpur nagpur rape case