ऑनलाइन शिक्षणाचा आठवडी अहवाल सादर करण्याचे आदेश

नागपूर : विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवडय़ाला ऑनलाईन शाळा भरणार आहे. तसे आदेशच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांनी काढले आहेत.

राज्यात शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण चांगल्या पद्धतीने सुरू आहे हे दर्शवण्यासाठी प्रत्येक शिक्षकांनी आपल्या अध्ययन अध्यापन कार्याचा साप्ताहिक अहवाल ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याबाबतचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेकडून देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत राज्यात शाळा बंद असल्या तरी विविध ऑनलाईन माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांकडे डिजिटल साधने उपलब्ध नाही अशा विद्यार्थ्यांच्या गृहभेटी घेऊन व शिक्षक मित्र उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षण देणे सुरू आहे.

शिक्षक करत असलेल्या या प्रयत्नांची, उपक्रमांची माहिती राज्य शासनास, केंद्रशासनास व इतर राज्यांना व्हावी याकरिता शिक्षण परिषदेने दिलेल्या लिंकवर शिक्षकांनी त्यांच्या   कार्याची माहिती भरायची आहे. ही माहिती शिक्षकनिहाय, शाळानिहाय, केंद्रनिहाय, तालुकानिहाय व जिल्हानिहाय आठवडय़ातून एकदा भरायची असून त्याकरिता प्रत्येक शिक्षकांनी पोर्टलवर आपली नोंदणी करायची आहे.

ऐकावे तरी कुणाचे?

एकीकडे अनेक शिक्षकांच्या सेवा करोना साथरोग उपाययोजना मोहिमेकरिता संलग्न करण्यात आलेल्या आहेत, तर दुसरीकडे शिक्षण विभागाकडून नवनवीन उपक्रम राबवण्याबाबत  सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. त्यामुळे एकाचवेळी दोन्हीकडे कसे काम करावे, नेमके ऐकावे तरी कुणाचे, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारला जात आहे.

सध्या शिक्षकांना करोनासंबंधित कामे करावी लागत आहेत. शिक्षण विभागाचे निर्देश व शिक्षणाधिकारी यांच्या विनंतीनंतरही स्थानिक जिल्हा प्रशासन शिक्षकांना कोविडच्या कामातून कार्यमुक्त करायला तयार नाही. अशावेळी शिक्षकांनी दोन्हीकडील कामे कशी करायची हा प्रश्न आहे.

– लीलाधर ठाकरे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती.