14 October 2019

News Flash

नापास विद्यार्थ्यांकडून गावाचा कायापालट

मेळघाटातील पायविहीर गावातील प्रयोग

मेळघाटातील पायविहीर गावातील प्रयोग

गावातील नापास, अल्पशिक्षित तरुणाईने वनहक्क कायद्याच्या साहाय्याने स्वत:चाच नव्हे तर संपूर्ण गावाचा कायापालट करून एक आदर्श उभा केला आहे.

पाच-सहा वर्षांपूर्वी मोठी माणसे कामानिमित्त बाहेर जायची. गावात एक भकासपणा जाणवायचा. गुणवत्ताहीन जीवन जगणे नाकारून लोकांना गावातच कामे मिळावीत आणि रोजगारासाठी त्यांना मजुरी करण्यासाठी स्थलांतर करावे लागू नये, या दुर्दम्य इच्छेतून रामलाल काळे या युवकाने इतर तरुणांच्या मदतीने प्रत्येकाच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी धडपड सुरू केली. अचलपूर तालुक्यात मेळघाटच्या पायथ्याशी असलेल्या पायविहीर गावात प्रयत्नपूर्वक १९२ हेक्टर जमीन मिळवली आणि त्यावर काम सुरू केले. गावातील अल्पशिक्षित, दहावी, बारावी नापास युवक-युवतींच्या प्रयत्नांतून आज या ओसाड जमिनीवर हिरवेगार जंगल उभे झाले. रोजगारासाठी लोकांचे स्थलांतरण थांबले. या जंगलात कोणती झाडे कुठे लावायची, सीताफळे किंवा तेंदुपत्त्याचे व्यवस्थापन, शासनाशी करावा लागणारा पत्रव्यवहार, ग्रामसभेची कामे, जंगल संरक्षण, ही सर्व कामे युवक-युवती मिळून करतात. वडीलधारी मंडळी केवळ मार्गदर्शन करतात. पायविहीर, उपातखेडा, जामडा आणि खतिजापूर अशी चार गावे आहेत. या जंगलात रोज ६५ ते ७० लोक काम करीत असून त्यांना २०३ रुपये रोजी मिळते. नर्सरीत लागणारी रोपे तरुणांनीच तयार केली असून आतापर्यंत १ लाख ४० हजार रोपे त्यांनी जंगलात लावली आहेत. सध्या आवळा, सीताफळे, बांबू, तेंदूपत्ता आणि इतर फळांनी जंगल व्यापले आहे.

वन हक्क कायद्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हापासून गाव समृद्ध झाले. तरुणाईच्या हातातच गावांचा पूर्ण कारभार आहे. आधी जंगल भकास होते. आता तेथे पशू-पक्षी दिसतात. ३५ फुटांवर पाणी लागते. यात आणखी संशोधन अपेक्षित आहे. जंगलात पशू-पक्ष्यांचा वावरही वाढला. इतर गावातील मुले शहरात जाऊन मोलमजुरी करतात. रस्त्यावर झोपतात. झोपडपट्टीत राहतात. त्यापेक्षा पायविहीर आणि इतर चारही गावांमध्ये रोजगार उपलब्ध आहे. कुणालाही बाहेर जायची गरज नाही.   – पौर्णिमा उपाध्याय, खोज संस्था.

गेल्या दोन वर्षांपासून दुष्काळसदृश्य स्थिती आहे. त्यामुळे फळांवर परिणाम झाला आहे. तरी सीताफळे व्यवस्थापन चांगले होते. अमरावती, नागपूर, मुंबईपर्यंत सीताफळे जातात. विद्यार्थ्यांचा अल्पशिक्षित तरुण-तरुणींचा गावाच्या कामांत सहभाग असतो. चारही गावांच्या जबाबदाऱ्या वाटून, समन्वय साधून युवा काम करतात. जलसंधारण, वन्यप्राण्यांसाठी पाणवठे उभे केले. लोकांना बाराही महिने काम मिळत असल्यामुळे स्थलांतरण थांबले.    – रामलाल काळे, सदस्य, ग्रामसभा.

 

First Published on February 8, 2019 12:45 am

Web Title: education in nagpur