डबीर, देशकर, भोयर आणि चांगदे विजयी

सिनेट पाठोपाठ विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवरही शिक्षण मंचाचेच निर्विवाद बहुमत सिद्ध झाले आहे. खुल्या प्रवर्गातून डबीर, देशकर, भोयर आणि चांगदे हे चार उमेदवार निवडणुकीनंतर विजयी घोषित करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी गुलाल आणि फटाके वाजवून आनंद साजरा केला.

गेल्या २८ फेब्रुवारीची स्थगित विधिसभा आज मंगळवारी दीक्षांत सभागृहात पार पडली. त्यात व्यवस्थापन परिषदेच्या खुल्या प्रवर्गातील चार जागांसाठी निवडणूक झाली. मागास प्रवर्गातून बिनविरोध निवडून आलेल्यांमध्ये दिनेश शेराम आणि चंदनसिंग रौटेले हेही शिक्षण मंचाचेच उमेदवार आहेत.

त्यांच्या विरोधात यंग टिचर्स असोसिएशन, विद्यापीठ विद्यार्थी संग्राम परिषद आणि सेक्युलर पॅनलने महायुती केली. मात्र, महायुतीला एकाही जागेवर विजय मिळू शकला नाही.

विधिसभेतून व्यवस्थापन परिषदेवर एकूण आठ सदस्यांना पाठवायचे होते. त्यापैकी प्राचार्य, प्राध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी आणि नोंदणीकृत पदवीधरांपैकी प्रत्येकी दोन सदस्यांना निवडून द्यायचे होते. यातील मागास प्रवर्गातील चार जणांची यापूर्वीच व्यवस्थापन परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामध्ये विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीतून चंदनसिंग रौटेले (प्राचार्य), इतर मागासवर्गातून नितीन कोंगरे (प्राध्यापक), अनुसूचित जातीतून सुधीर फुलझेले (व्यवस्थापन प्रतिनिधी) आणि अनुसूचित जमातीतून दिनेश शेराम (नोंदणीकृत पदवीधर) यांचा समावेश आहे. त्यामुळे आज केवळ खुल्या प्रवर्गातील चार उमेदवारांसाठी निवडणूक होती. त्यात प्राचार्य प्रवर्गातून उर्मिला डबीर, प्राध्यापकांमधून निरंजन देशकर, व्यवस्थापन प्रतिनिधी म्हणून राजेश भोयर तर नोंदणीकृत पदवीधरांमधून विष्णू चांगदे विजयी झाले. डबीर यांच्या विरोधात प्राचार्य मृत्युंजय सिंग उभे होते.

प्राध्यापक प्रवर्गातून देशकर आणि प्रदीप बुटे यांच्यामध्ये चुरस होती, व्यवस्थापन प्रतिनिधी गटात भोयर यांच्या विरुद्ध किशोर उमाठे होते तर नोंदणीकृत पदवीधर गटात विष्णू चांगदे आणि मोहन वाजपेयी यांच्यात लढत होती. यापैकी डबीर, देशकर, भोयर आणि चांगदे हे चारही शिक्षण मंचचे उमेदवार निवडून आले.

भोयर यांचे महत्त्व वाढले

राजेश भोयर आजच्या घडीला सिनेट, व्यवस्थापन परिषद आणि विद्वत परिषद अशा विद्यापीठाच्या सर्व महत्त्वाच्या प्राधिकरणांवर आहेत. हे विशेष. सिनेटमधून त्यांची आजच व्यवस्थापन परिषदेसाठी निवड झाली आणि आजच त्यांना व्यवस्थापन परिषदेतून विद्वत परिषदेवर नामनिर्देशित करण्यात आले.

स्थायी समितीवरही वर्चस्व

सिनेट, व्यवस्थापन परिषदे पाठोपाठ स्थायी समितीवरही शिक्षण मंचानेच बाजी मारली आहे. त्यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, पदवीधर प्रवर्गातून शिक्षण मंचच्या उर्मिला डबीर, प्रकाश पवार आणि वसंत चुटे विजयी झाले आहेत.  आजच सिनेटमधून निवडून व्यवस्थापन परिषदेवर गेलेले राजेश भोयर यांना विद्वत परिषदेवर नामनिर्देशित करण्यात आले. याशिवाय स्थायी समितीवर प्राचार्य, प्राध्यापक आणि पदवीधर प्रवर्गातून शिक्षण मंचाचेच उमेदवार निवडून आले हे विशेष. या तिन्ही जागांसाठी आज सिनेटमध्ये निवडणूक झाली. त्यात प्राचार्य गटासाठी डबीर आणि धनवटे यांच्यात चुरस होती. त्यात डबीर यांना ४१ तर धनवटे यांना २४ मते मिळाली. प्राध्यापक प्रवर्गात प्रकाश पवार विजयी झाले. त्यांना ४० मते मिळाली, तर नोंदणीकृत पदवीधरांमध्ये वसंत चुटे आणि प्रशांत डेकाटे यांच्या लढत होती. त्यात चुटे यांना ३९ मते मिळाली. स्थायी समितीवरही तीनही सदस्य शिक्षण मंचचे नामनिर्देशित झाले. या तिन्ही जागांसाठी एकूण ७६ विधिसभा सदस्य मतदार होते. त्यापैकी ७० जणांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी ६५ वैध मते होती तर पाच मते अवैध ठरली. याशिवाय तक्रार निवारण समितीवर एक प्राध्यापक व एक शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे नामनिर्देशन करायचे होते. त्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी केवळ राजेंद्र पाठक यांचाच अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली तर तक्रार निवारण समितीवर विद्यापीठ शिक्षण संघटनेचे (नुटा) नितीन कोंगरे  विजयी झाले.