चांगले शिक्षण व संस्कार यातून देशाची पुढील पिढी निर्माण होते. त्यामुळे शिक्षणाचे सार्वत्रिकरण होत असताना या स्पर्धेच्या युगात शैक्षणिक संस्थांवर शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याची जबाबदारी महत्त्वाची ठरते, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

शनिवारी नागपूर येथे भारत एज्युकेशन सोसायटी, महाल या संस्थेच्या ७५ व्या वर्षांनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रामनगर येथील भारत विद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. विकास सिरपूरकर, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.उमा वैद्य उपस्थित होते.

शिक्षणावर होणारा सरकारचा खर्च हा देशाच्या भावी पिढीसाठी केलेली गुंतवणूक असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संशोधन आणि नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यावर अधिक भर देणे गरजेचे असते. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला नाविण्य, उद्यमशिलता आणि संशोधनाची जोड दिल्यास ज्ञानाचे रूपांतर संपत्तीत होते, असे गडकरी म्हणाले. मूल्यांवर आधारित शिक्षण पद्धती ही भारताची विशेषत: आहे. मात्र काळानुरूप शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या कार्यपद्धतीने बदल घडविणेही तेवढेच आवश्यक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांनी भरपूर खेळावे, असे आवाहन सिरपूरकर यांनी केले. ज्ञान ही भारताची सर्वात मोठी संपत्ती आहे, असे डॉ. उमा वैद्य म्हणाल्या. यावेळी एका स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाला भारत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ‍ॅड. अशोक बन्सोड, सचिव डॉ. सेनाड, आमदार नागो गाणार, शाळेचे माजी विद्यार्थी, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.