नागपूर : विदर्भात करोनाबाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी प्रशासनाकडून तसेच सामाजिक संघटनांकडून ठिकठिकाणी प्रयत्न केले जात आहे. त्यात अमरावतीच्या सुपर स्पेशालिटीत ४५ खाटा वाढवणार आहे. वर्धेत कॉन्सट्रेटरद्वारे प्राणवायूचा घरपोच पुरवठा करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तुटवडा बघता पाच तालुक्यात नैसर्गिक हवेतून प्राणवायू तयार करण्याचा प्लान्ट तयार करण्यात येत आहे. वाशीममध्ये ‘आरटीपीसीआर’ प्रयोगशाळेची क्षमता वाढणार आहे. वर्धेच्या महात्मा गांधी आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालयात शंभर खाटांचे करोना रुग्णालय खासगी  तत्त्वावर मंजूर करण्यात आले आहे.

वाशीममध्ये ‘आरटीपीसीआर’ प्रयोगशाळेची क्षमता वाढणार

अकोला : करोनाबाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शनच्या पुरवठ्याविषयी वाशीमचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. जिल्ह्यासाठी नियमितपणे आणि पुरेशा प्रमाणात प्राणवायू व रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी त्यांनी तातडीने अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक सूचना केल्या. जिल्ह्यात करोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्यांची संख्या आणखी वाढवावी लागणार आहे. यासाठी ‘आरटीपीसीआर’ प्रयोगशाळेची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर आदी आढावा बैठकीमध्ये सहभागी झाले होते. जिल्हा कोविड रुग्णालय तसेच कारंजा येथील कोविड केंद्रामध्ये प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची संख्या वाढवण्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करावी. जिल्हा कोविड रुग्णालय येथील ‘ऑक्सिजन जनरेशन प्लान्ट’ कार्यान्वित झाल्यानंतर दर मिनिटाला २०० लिटर प्राणवायू तयार होणार आहे. याठिकाणी आणखी एक दर मिनिटाला ६०० लिटर प्राणवायू निर्मिती करणारा प्रकल्प उभारण्यासाठी त्वरित नियोजन करून आवश्यक कार्यवाही गतिमान करावी. ‘आरटीपीसीआर’ प्रयोगशाळेची क्षमता वाढवण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री देसाई म्हणाले. ३० एप्रिलपर्यंत ४५ वर्षांवरील जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्यात यावे. तसेच १ मेपासून १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी लसीकरण केंद्रांचे सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

५ मेट्रिक टन प्राणवायूचा साठा निश्चित

जिल्ह्यात सध्या प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांवर ३३६ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच १५ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तसेच २३ रुग्णांना ‘एनआयव्ही’च्या सहाय्याने उपचार सुरू आहेत. जिल्ह्यासाठी ५ मेट्रिक टन प्राणवायूचा साठा निश्चित करण्यात आला असून अकोला अमरावती येथून हा प्राणवायू उपलब्ध होत आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.