|| महेश बोकडे

विद्यार्थ्यांना रुग्णसेवेचे तंत्र शिकवण्याचा प्रयत्न :- मिहानमधील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेकडून (एम्स) आता त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) काही वार्ड उसनवारीवर घेतले जाणार आहेत. मेडिकलने त्याला होकार दर्शवत एम्सला आवश्यक खाटांची माहिती विचारली आहे. एम्सकडे निवासी डॉक्टर नसल्याने सुरुवातीला मेडिकलच्या डॉक्टरांवरच येथील सेवेचा डोलारा राहणार आहे.

शासनाने एम्ससाठी मिहान परिसरात जागा उपलब्ध करून दिली असून तेथील बांधकाम अमेरिकेतील नावाजलेल्या आर्किटेक्टच्या मदतीने सुरू आहे. वास्तूचा काही भाग एम्सला हस्तांतरित झाल्याने एम्सचे सर्वच वर्ग आता मिहानच्या वास्तूत स्थानांतरित झाले आहेत, तर मेडिकलमधील सर्व प्रयोगशाळाही आता तेथे हलवल्या आहेत. मेडिकलमध्ये २०१८-१९ पासून एम्सच्या ५० विद्यार्थ्यांची तुकडी सुरू झाली होती. ही विद्यार्थी संख्या २०१९-२० पासून १०० करण्यात आली आहे. या तुकडय़ा सध्या मिहानमध्ये सुरू झाल्या आहेत. एम्सची विद्यार्थी संख्या वाढत असल्याने व त्यांनी दुसऱ्या वर्षांत पदार्पण केल्याने या विद्यार्थ्यांना रुग्णसेवेचे तंत्र शिकवणे आवश्यक आहे.

हा उपक्रम सुरू करण्यासाठी एम्सकडून मेडिकल प्रशासनाला त्यांचे काही वार्ड उसनवारीवर मागण्यात आले आहेत. त्यासाठी अधिष्ठात्यांनी होकार दर्शवत एम्सला तुम्हाला आवश्यक खाटांची माहिती व कोण्त्या पायाभूत सोयी हव्या? त्याबाबत कळवण्यास सांगितले आहे. एम्सने खाटांची संख्या कळवल्यास भारतीय वैद्यकीय परिषदेच्या निकषानुसार मेडिकलच्या खाटा वगळून इतर खाटा एम्सला दिल्या जातील. सध्या एम्सकडे सध्या नॉन क्लिनिकलचे जास्त व क्लिनिकलचे कमी प्राध्यापक आहेत. प्रत्येक वर्षी या डॉक्टरांची संख्या वाढवली जात आहे. दरम्यान, आजपर्यंत येथे एकही निवासी व वरिष्ठ निवासी डॉक्टरांची नियुक्ती नाही. त्यामुळे मेडिकलमध्ये एम्सला दिल्या जाणाऱ्या उसनवारीच्या वार्डाची धुराही मेडिकलच्या डॉक्टरांवरच राहण्याचे संकेत आहेत. एम्सचे शिक्षक केवळ त्यांच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यापुरते येथे येणार आहेत. यादरम्यान काही तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या उपचाराबाबत सल्ला दिला जाणार असल्याने मेडिकलमधील रुग्णांना त्याचा लाभ होण्याची आशा आहे.

मिहान परिसरात बाह्य़रुग्णसेवा सुरू

एम्सकडून सध्या मिहान परिसरात बाह्य़रुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे. या भागाच्या जवळपासच्या भागातून रुग्ण तेथे उपचाराला काही प्रमाणात जात आहेत. तेथे काही क्ष-किरणासह इतरही तपासण्यांची सोय एम्सकडून करण्यात आली आहे.

‘‘एम्सकडून मेडिकलचे काही वार्ड रुग्णसेवेसाठी उपलब्ध करून देण्याची विनंती आल्यावर त्याला होकार दर्शवण्यात आला आहे. खाटांसह आवश्यक पायाभूत सूविधेबाबत एम्सने कळवताच त्यांना या सोयी उपलब्ध करून दिल्या जातील.’’ – डॉ. सजल मित्रा, अधिष्ठाता, मेडिकल.