दुकान उघडण्याचे धाडस कुणीच केले नाही

नागपूर :  मांस विक्री करणारी दुकाने खुली राहू शकतात, असे पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी बुधवारी जाहीर केले. पण, त्यानंतरही शहरात मांस विक्री करणाऱ्यांनी दुकान उघडण्याचे धाडस केले नाही.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकान व प्रतिष्ठाने वगळता सर्व व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मांस, मासोळी विक्रीचे दुकान बंद करण्यात आली. दरम्यान कोंबडी, बोकड, बोलई, मासोळी आदी जीवनावश्यक वस्तू असून त्या लोकांना मिळायला हव्यात अशी मागणी करण्यात आली.

त्यानंतर जिल्हा प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेऊन मंगळवारी मंडी, कोंबडी, बोकड, बकरीचे मांस आणि मासोळी विक्री करण्याऱ्या दुकानांवर कारवाई न करण्याचे आदेश पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतरही बुधवारी मांस व मासोळी विक्रेत्यांनी दुकान उघडण्याचे धाडस केले नाही.

अंडी-चिकनमुळे करोना नाही – केदार

अंडी-चिकन सेवनामुळे करोनाचा प्रादुर्भाव होत नाही. याबाबत अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी केले. रोगप्रतिकार शक्तीद्वारे विविध आजारांचा प्रतिकार शक्य आहे. यासाठी नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात दूध, अंडी व चिकन सेवन महत्त्वाचे आहे, याकडे केदार यांनी लक्ष वेधले.  चिकनमध्ये करोना विषाणू असल्याची अफवा पसरवाऱ्या दोघांना  आंध्रप्रदेश व उत्तरप्रदेशातून ताब्यात घेण्यात आले आहे. संचारबंदीत दूध, ब्रेड, अंडी, मांस जीवनावश्यक बाबी असल्याने त्यांची वाहतूक व विक्री यांना प्रतिबंधक यादीतून वगळण्यात आलेले आहे. याविषयी काही अडचणी उद्भवल्यास पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्रसिंग यांचेशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२२८८५५११) किंवा अतिरिक्त आयुक्त पशुसंवर्धन श्री. फरकाळे यांचेशी (भ्रमणध्वनी क्रमांक ९४२३२०७०७०) संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.