केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे निर्देश

नागपूर : करोनाच्या पहिल्या लाटेत विदेशातील प्राणिसंग्रहालयातल्या वाघांना तर दुसऱ्या लाटेत भारतातील प्राणिसंग्रहालयातील सिंहांना करोनाची लागण झाल्याने केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण सतर्क झाले आहे. संपूर्ण भारतातील प्राणिसंग्रहालयातील मार्जार कुळातील प्राण्यांची करोना चाचणी करण्याबाबतचे निर्देश त्यांनी दिले आहेत. परंतु, या प्राण्यांची चाचणी करणे सोपे नसल्याने (पान ६ वर) (पान १ वरून) यंत्रणेसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे.

हैदराबाद येथील प्राणिसंग्रहालयात नऊ सिंहांना करोनाची लागण झाल्यानंतर भारतातील सर्वच प्राणिसंग्रहालयांची चिंता वाढली. तत्पूर्वीच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने करोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणिसंग्रहालयांसाठी नियमावली जाहीर केली आहे. ३० एप्रिलला जाहीर केलेल्या या नियमावलीत मार्जार कुळातील प्राण्यांची करोना चाचणी करण्यास सांगितले आहे. हैदराबादच्या प्राणिसंग्रहालयात ज्या सिंहांना करोनाची लागण झाली त्यांची सर्व लक्षणे ही माणसांमध्ये आढळणाऱ्या करोनासारखीच आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाचे निर्देश पाळणे आवश्यक असले तरीही प्राणिसंग्रहालय प्रशासनासाठी ते अडचणीचे ठरणार आहे. मार्जार कु ळात वाघ आणि बिबटय़ांचा समावेश होतो. या प्राण्यांची चाचणी करण्याआधी त्यांना बेशुद्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांची परवानगी आवश्यक आहे. उन्हाळ्यात या प्राण्यांना बेशुद्ध करणे आणखी कठीण आहे. या काळात अनावश्यक बेशुद्ध करताना या प्राण्यांच्या अवयवांना धोका पोहोचण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे असे झाल्यास काय करायचे, हा मोठा प्रश्न प्राणिसंग्रहालय प्रशासनासमोर आहे.

माणसांपासूनच बाधा झाल्याची शक्यता

हैदराबादमधील सिंहांमधील करोनाची लक्षणे माणसांना होणाऱ्या करोनासारखीच आहेत. त्यामुळे माणसांपासूनच त्यांना करोना झाला असण्याची दाट शक्यता आहे. तत्पूर्वी पहिल्या लाटेत न्यू यॉर्क प्राणिसंग्रहालयात वाघाला आणि हाँगकाँगमध्ये श्वानाला करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. करोनाचे विविध प्रकार आधीपासूनच अस्तित्वात असून श्वान आणि मांजर यामध्ये ही लक्षणे याआधीही आढळून आली आहेत. त्यांच्या लशीदेखील उपलब्ध असल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद धूत यांनी सांगितले.

फक्त भोपाळमध्ये तपासणी सुविधा

अनेक पशुवैद्यकांना करोनाची बाधा झाली आहे. गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातही अनेक पशुवैद्यक बाधित आहेत. त्यांच्याशिवाय ही चाचणी अशक्य आहे. तसेच करोना चाचणीसाठी नमुने घेतल्यानंतर त्याच्या तपासणीची प्रक्रिया मोठी आहे. प्राण्यांच्या करोना चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्याची तपासणी के वळ भोपाळ येथे के ली जाते. त्यामुळे हे सर्व नमुने प्राणिसंग्रहालयांना भोपाळ येथे पाठवताना आणखी काळजी घ्यावी लागणार आहे, असे प्राणिसंग्रहालय प्रशासनातील एका अधिकाऱ्याने सांगितले.