सात दिवसांमध्ये आठ खून; घरात दडलेले गुन्हेगार पुन्हा रस्त्यावर

मंगेश राऊत, लोकसत्ता

नागपूर : करोनामुळे  टाळेबंदीच्या काळात संचारबंदीही लागू असल्याने शहरातील गुन्हेगारीचे प्रमाण कमालीचे घटले होते. पण, आता संचारबंदी शिथिल होत असताना गुन्ह्य़ांचे प्रमाण वाढत असून खुनाच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ  झाली आहे. गेल्या सात दिवसांमध्ये आठ खुनाच्या घटनांची नोंद झाली असून बंदोबस्तात व्यस्त असणाऱ्या पोलिसांसमोर आता कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याचेही मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

व्यवहार पूर्ववत होत असून गुन्हेगारही आता घराबाहेर पडत आहेत. याची परिणती गुन्हे घडण्यात होत आहे.

गेल्या सात दिवसांमध्ये सहा खुनांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. यात प्रामुख्याने २७ मे रोजी एमआयडीसी आणि सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत खून झाले. २९ मे रोजी पारडी पोलीस ठाण्यांतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला.

१ जूनला लकडगंज पोलीस ठाण्यांतर्गत, २ जूनला कोतवाली आणि ३ जूनला यशोधरानगमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मार्च महिन्यात संपूर्ण शहरात केवळ ५ खुनाच्या घटना घडल्या. कारण, १८ मार्चनंतर टाळेबंदी जाहीर झाली होती. एप्रिल महिन्यात कठोर टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने केवळ ४ खुनाच्या घटना घडल्या होत्या. मे महिन्याच्या शेवटी टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल झाली. त्यामुळे त्या  महिन्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होऊन ७ ठिकाणी खुनाचे गुन्हे दाखल झाले. आता जून महिन्यात व्यवहार पूर्ववत होत असतानाच चार दिवसांमध्ये ५ आणि गेल्या २४ तासांमध्ये तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत.

गंभीर गुन्ह्य़ांचा आलेख

महिना      खून         खुनाचा प्रयत्न        दरोडा      घरफोडी      बलात्कार

मार्च          ०५                 ०८                    ०१           ५२              १६

एप्रिल        ०४                 ०३                     ०           २२               ३

मे               ०७                ०७                     ०३          ३२              ८

जून         ०५ (आतापर्यंत)

हुडकेश्वरमध्येही तरुणाची हत्या

म्हाळगीनगर परिसरात  वैमनस्यातून एका तरुणाचा कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला. वैभव मात्रे (३०) रा. भोलेबाबानगर असे मृताचे नाव आहे. ही घटना चैतन्य होमिओपॅथी फार्मसीजवळ गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता घडली. दोन तरुणांनी दुचाकीने पाठलाग करून हा खून केला असून ऋतीक ऊर्फ मांजी रा. आशीर्वादनगर आणि किटानू अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी कुख्यात गुंड असून त्यांचा शोध सुरू आहे. बातमी लिहिस्तोवर खुनाचे कारण स्पष्ट झाले नव्हते.

एम्प्रेस मॉल परिसरातही खून?

एम्प्रेस मॉल परिसरातील झाडीझुडुपात एक कुजलेला मृतदेह आज गुरुवारी सापडला. हा मृतदेह ४५ ते ५० वयोगटातील इसमाचा असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून गणेशपेठ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. पण, त्याचा खून करून मृतदेह झाडांमध्ये  फेकण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

गोपालनगरमध्ये प्रेमप्रकरणातून खून

गोपालनगर परिसरात एका तरुणाचा प्रेमप्रकरणातून  खून करण्यात आला. ही घटना आज गुरुवारी दुपारी  घडली. मारेकरी हा मुलीचा भाऊ असल्याची प्राथमिक माहिती असून त्याच्यासोबत एक मित्र होता, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. कार्तिक सारवे (२४) रा. गोपालनगर असे मृताचे नाव आहे. तो  कामानिमित्त गोपालनगर परिसरात भाडय़ाने राहायचा. अवधूत काणे यांच्याकडे तो वसुली व तंत्रज्ञ म्हणून काम करायचा. आज दुचाकीने परत येत असताना मारेकऱ्यांनी त्याच्या डोक्यावर  वार करून ठार केले.  घटनेची माहिती मिळताच प्रतापनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव खणदाळे, सहाय्यक आयुक्त केशव शेंगळे, गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त सुधीर नंदनवार  घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात कार्तिक याचे जयताळा येथील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्याला मुलीच्या भावाचा विरोध होता. या विरोधातूच मुलीच्या भावाने आपल्या एका मित्रासह त्याचा खून केल्याची माहिती समोर आल्यानंतर मुलीच्या भाऊ अमोल धारगे याच्यासह दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे. ही घटना  सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद  झाली असून घटनास्थळाच्या बाजूला सर्व दुकाने उघडी असताना कोणीही कार्तिकच्या मदतीला धावले नाही.

कुख्यात अन्नू ठाकूरला संपवले

वाहने जाळण्याचे पैसे न दिल्यामुळे विरोधी टोळीतील काहींनी मिळून कुख्यात गुंडाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना बुघवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. अनुज ऊर्फ अन्नू ठाकूर सुदाम बघेल (२४) रा. वनदेवीनगर असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी उस्मान अली युसूफ अली, मेहबूब अली युसूफ अली आणि मख्खन ऊर्फ मोहम्मद कलीम अंसारी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अन्नूविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपूर्वी अन्नूने परिसरातील दोन वाहने जाळली होती. त्यात उस्मानचे एक वाहन होते. उस्मान त्याला नुकसान भरपाई मागत होता. बुधवारी रात्री तो मित्राच्या बहिणीच्या स्वागत समारंभात गेला होता. त्या ठिकाणी आरोपी पोहोचले व अन्नूला बाहेर घेऊन गेले. एका गल्लीत त्याच्यावर चाकू व दगडाने वार करून खून केला. या प्रकरणात पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली.