कारागृहातून न्यायालयाच्या प्रवासादरम्यान सहकार्य

पिंटू शिर्के हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड राजू भद्रे याला कारागृहातून न्यायालयापर्यत नेताना सर्व प्रकारचे सहकार्य करणाऱ्या आठ पोलीस कर्मचाऱ्यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

दशरथ चिंधुजी धुर्वे, अजय कृष्णा नेवारे, सुरेश कवडुजी बेले, मुनींद्र काशीनाथ भांगे, हर्षल भास्करराव पोवळे, जयंत कृष्णाजी झाडे, मनोज नामदेव कोडापे आणि संजय विक्रमसिंग ठाकूर, अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. सर्वजण मुख्यालय कारागृहाच्या आरोपी एस्कॉर्ट सेलमध्ये कार्यरत होते. क्रिकेट बुकी अजय राऊत याचे अपहरण करून त्याच्याकडून पावनेदोन कोटी खंडणी मागण्याच्या प्रकरणात राजू भद्रे याला वेळोवेळी विशेष मोक्का न्यायालयात हजर केले जात होते. राजू भ्रदे व त्याच्या साथीदारांना कारागृहातून न्यायालयात आणणे आणि पुन्हा कारागृहात पोहोचवण्याचे काम आरोपीच करीत होते. या दरम्यान राजू भद्रेला त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घालून देणे, मोबाईलवरून इतरांशी संपर्क करून देणे, अंमली पदार्थ उपलब्ध करून देणे आधी सुविधा पुरवायचे. त्याकरिता राजू भद्रे हा त्यांना पैसे मोजायचा. अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू होता. हा प्रकार एका पोलीस कर्मचाऱ्याच्या लक्षात आला. त्यानंतर त्याने पोलीस आयुक्तांकडे संबंधितांची तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी मुख्यालयाचे उपायुक्तांद्वारे सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी पाटील यांची चौकशी समिती नेमली. या समितीने सात महिने सर्व आरोपींची सुनावणी घेतली. त्यांना स्पष्टीकरण मागितले.

त्यानंतर कारागृहातून विशिष्ट आरोपींची ने-आण करण्यासाठी कायम तेच कामावर असायचे, हे निष्पन्न झाले. शिवाय कोणत्या कैद्याची न्यायालयात केव्हा हजेरी आहे, हे त्यांनाच माहित असायचे. त्यानुसार ते आपली सेवा देत होत, असे स्पष्ट झाल्यानंतर पाटील यांनी संबंधितांना दोषी धरून अहवाल मुख्यालयाचे उपायुक्त रवींद्र परदेशी यांच्याकडे सादर केला. त्या अहवालाच्या आधारावर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने आठही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.

पत्नीशी मोबाईलवर संपर्क

यातील काही पोलीस कर्मचारी भद्रेच्या पत्नीशी संपर्कात होते. त्यांच्या मोबाईलचा सीडीआर तपासण्यात आला असता त्यांच्या मोबाईलवरून न्यायालयातील सुनावणीच्या दरम्यान व नंतर अनेकदा संपर्क केला व तासनतास बोलणे झाल्याचे तपासात निष्पन्न झाले असल्याचे पाटील यांच्या अहवालात नमूद आहे.

तपासादरम्यान दोघांना फटका

अजय राऊत अपहरण व खंडणी प्रकरणाचा तपास करताना आरोपींशी संपर्क ठेवणे व अर्थकारणाचा आरोप झाल्याने गुन्हे शाखेचे तत्कालिन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर ढोले यांना निलंबित करण्यात आले होते. तर पोलीस शिपाई कुलदीप पेटकर याला बडतर्फ करण्यात आले. त्या प्रकरणातून राजू भद्रे आणि इतर आरोपी निर्दोष सुटले. मात्र, एकटय़ा भद्रेने आतापर्यंत आठ पोलिसांचा बळी घेतला, हे येथे विशेष.