निवडणूक प्रतिज्ञापत्रातील माहिती

काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी आज गुरुवारी पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यासोबत जोडलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याविरुद्ध २५ गुन्ह्य़ांची नोंद आहे. विशेष म्हणजे, हे सर्व गुन्हे विनापरवानगी आंदोलन करण्यासंदर्भातील असून एकच गुन्हा बेकायदा एकत्र येण्यासंदर्भातील आहे.

विकास ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांकडे एकूण ३ कोटी ५६ लाख ८२ हजार २९३ रुपयांची चल व अचल संपत्ती आहे. त्यापैकी विकास ठाकरे यांच्याकडे ५१ लाख १३ हजार २५१ रुपयांची चल संपत्ती असून, ४८ लाख २२ हजार ६२५ रुपयांची अचल संपत्ती आहे. त्याच्यावर ३७ लाख ३२ हजार ६५७ रुपयांचे विविध बँकांचे कर्ज व ३ लाख २४ हजारे किंमतीचे सोने व चांदीचे दागिने आहेत. त्यांची पत्नी वृंदा ठाकरे या त्यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. त्यांच्याकडे ९६ लाख ९८ हजार ७९ रुपयांची चल व १ कोटी २४ लाख ४७ हजार ६२५ रुपयांची अचल संपत्ती आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या बँकांचे ४९ लाख ८९ हजार १२९ रुपयांचे कर्ज आहे. १० लाख ४८ हजार २०० रुपयांचे दागिने व ३० लाख ५२ हजार ७६ रुपये किंमतीची एक फोड एंडिएव्हर कार आहे.

मोठा मुलगा केतन याच्याकडे २३ लाख ५४ हजार ६५ रुपयांची चल संपत्ती आहे. त्यात २१ लाख ५७ हजार रुपये किंमतीच्या टोयोटा इनोव्हा कारचा समावेश आहे. लहान मुलगा ऋषभ याच्याकडे ११ लाख ५९० रुपये किंमतीच्या स्वीफ्ट कारसह १२ लाख ४६ हजार ६४८ रुपयांची संपत्ती असून ८ लाख ५९० रुपयांचे कर्ज आहे. अशाप्रकारे ठाकरे कुटुंबाकडे एकूण साडेतीन कोटीची संपत्ती आहे. २०१४ च्या निवडणुकीसाठी ठाकरे यांनी दिलेल्या संपत्तीच्या विवरणात त्यांच्याकडे २ कोटी ४९ लाख ३८ हजारांची तर त्यांच्या पत्नीकडे ४  कोटी ७७ लाख रुपयांची संपत्ती असल्याचे नमूद केले होते.

विजय वडेट्टीवार कुटुंबीयांची कोटींची उड्डाणे

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला आहे. यावेळी दाखल प्रतीज्ञापत्रात त्यांनी आपल्याविरुद्ध एकही गुन्हा नसल्याचे नमूद केले असून त्यांच्या कुटुंबाची एकूण संपत्ती ३२ कोटी १७ लाख ९३ हजार ४९० रुपये इतकी दर्शवली आहे. २०१४ च्या तुलनेत त्यांच्या संपत्तीत १६ कोटी २५ लाखांनी वाढ झाली आहे. प्रतीज्ञापत्रानुसार, वडेट्टीवार यांचे उत्पन्नाचे स्रोत शेती व मानधन असे आहे. पत्नी किरण यांच्या उत्पन्नाचे साधन शेती व व्यापार आहे. विजय वडेट्टीवार यांच्याकडे ७ कोटी ३१ लाख ७३ हजार ८७० रुपयांची चल व अचल संपत्ती आहे. त्यापैकी ६३ लाख ५१ हजार ५८० रुपयांच्या बँक ठेवी, २ कोटी १ लाख ६१ हजार २०८ रुपयांचे विविध कंपन्यांमध्ये समभाग, २ कोटी ५३ लाख ९६ हजार ४०० रुपयांचे विमा आहे. त्यांच्यावर ९४ लाख ७० हजार २५८ रुपयांचे विविध बँकांचे कर्जही आहे. त्यांच्या मालकीची टोयोटा इनोव्हा कार असून त्यांच्याकडे १३ लाख ६० हजारांचे दागिने आहेत. त्यांच्या पत्नीकडे २४ कोटी ८० लाख ०४ हजार १७० रुपयांची एकूण संपत्ती आहे. मुलगी शिवानीकडे २ लाख ६७ हजार ६५६ रुपये, देवयानीकडे १ लाख ३१ हजार ५६१ रुपये आणि मुलगा २ लाख १६ हजार ३२३ रुपयांची संपत्ती आहे. २०१४ मध्ये सर्व कुटुंबाकडे १५ कोटी ९२ लाख १४ हजार ७७१ रुपयांची संपत्ती होती. त्यापैकी वडेट्टीवारांच्या नावाने ३ कोटी २७ लाख रुपयांची संपत्ती होती, हे विशेष.