एलईडी बिल्ले आणि ईव्हीएम मशीनची धूम 

नागपूर : आगामी लोकसभेच्या निवडणुकीसाठी बाजारात आलेले प्रचार साहित्यही आता ‘डिजिटल’ झाले आहेत.  पूर्वी खिशाला लावण्यासाठी मिळत असलेले प्लास्टिकचे बिल्ले आता एलईडीच्या स्वरूपात बॅटरीवर तयार करण्यात आले आहेत. मतदारांमध्ये ईव्हीएमबद्दल जनजागृती करण्यासाठी डमी ईव्हीएम मशीनचीही बाजारात धूम सुरू आहे.

शहरात लोकसभा निवडणुकीचा ज्वर आता चांगलाच चढू लागला आहे.  प्रत्येक गल्लीबोळात पक्षाचे झेंडे आणि नेते मंडळींचे भले मोठे फ्लेक्स व कट ऑऊट लावण्याचे काम सुरू आहे. उत्साही कार्यकत्रे गळ्यात पक्षाचा दुपट्टा आणि टोपी घालून उमेदवारांसोबत फिरत आहेत. निवडणुकांमध्ये सर्वात महत्त्वाच्या असलेल्या प्रचार साहित्यामध्येही यंदा अत्याधुनिक बदल करण्यात आले आहेत. डिजिटल प्रचार साहित्यांवर जास्त भर दिला जात आहे. विविध आकारात एलईडीचे छोटे दिवे लावून त्यामध्ये पक्षाचे निवडणूक चिन्ह अंकित असलेले बिल्ले पंचवीस ते पन्नास रुपये प्रत्येकी अशा किंमतीत उपलब्ध आहेत. दिल्ली येथून हे सर्व बिल्ले आणले जात आहेत. तसेच मतदारांना मार्गदर्शन करण्यासाठी डमी ईव्हीएमची देखील मागणी काही उमेदवारांकडून केली जात आहे.  नेते मंडळीचे डिजिटल कट आऊटही यंदाच्या निवडणुकांमध्ये विशेष आकर्षण आहे. ५० फूट उंचीचे डिजिटल कट आऊट विशेष एलईडीच्या विविध रंगांच्या दिव्यांनी तयार करण्यात आले असून स्पीकरच्या माध्यमातून उमेदवाराचे भाषण जनतेला ऐकता येणार आहे. मात्र, याची किंमत अधिक असल्याने नागपुरात अजून एकाही उमेदवाराने याची नोंदणी केलेली नाही. याशिवाय पारंपरिक कागदी बिल्ले, दुपट्टे, मोठे फुगे, टीशर्ट, टोप्या, झेंडे यांची मागणी कायम आहे. या प्रचार साहित्यांची उलाढाल पंधार कोटींच्यावर आहे. पंजा, कमळ, धनुष्यबाण या पक्षांच्या साहित्याची मागणी जास्त असते, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

नागपुरात बहुतांश प्रचाराचे साहित्य मेरठ आणि दिल्ली येथून येते. काही प्रमाणात प्रचार साहित्य आम्ही तयार करतो. यामध्ये पारंपरिक टोप्या, किचेन, दुपट्टे,पक्षाचे चिन्हे, टी-शर्ट आदींचा समावेश आहे. यंदा बाजारात मागणी कमी असून भाजपकडून मात्र प्रचार साहित्याची मागणी अधिक आहे. या व्यवसायात दहा ते पंधरा कोटींची उलाढाल होते.

– जगदीश कारवा, प्रचार साहित्याचे ठोक विक्रेते