मतदारांची संख्या निश्चित करणार

निवडणुकीच्या काळात मतदान केंद्रांवर लागणाऱ्या रांगा आणि त्यासाठी होणारी गर्दी कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदान केंद्रांवरील मतदारांची संख्या मर्यादित ठेवण्यावर भर दिला आहे. नगर पालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीत एका केद्रावर ६०० मतदार असतील महापालिकांसाठी ही संख्या ८०० ते १०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रावर लागणाऱ्या रांगा, त्यामळे होणारी गर्दी व ती आटोक्यात आणण्यासाठी ठेवावा लागणारा पुरेसा पोलीस बंदोबस्त याची व्यवस्था जिल्हा प्रशासनाला करावी लागते. यासोबतच मतदारांसाठी आवश्यक त्या सोयी सुविधाही उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची असते. निवडणुका जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे नगर पालिका, नगर पंचायत आणि महापालिकांच्या असेल तर त्यात कमालीची चुरस निर्माण होते, प्रत्येक उमेदवार आप-आपल्या मतदारांना केंद्रावर आणण्यासाठी आटापिटा करीत असतो व त्यामुळेही गोंधळाची स्थिती निर्माण होते. एका केंद्रावर जर जास्त संख्येने मतदार असेल तर या गोंधळात अधिक भर पडते. या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवणे तसेच मतदानाची प्रक्रिया सहजपणे पूर्ण होणे यासाठी निवडणूक आयोगाने मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या निश्चित केली आहे. नगर पालिका आणि नगर पंचायतीसाठी ती प्रती केंद्र ६०० मतदार इतकी आहे. २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी प्रत्येक केंद्रावरील मतदारांची संख्या ही १२०० ते १४०० मतदार इतकी होती. महापालिका निवडणुका बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहेत.

चार वॉर्ड मिळून एक प्रभाग असणार आहे. त्यामुळे प्रत्येक मतदाराला चार मते देण्याचा अधिकार असेल. ज्या जिल्ह्य़ात या निवडणुका आहे, तेथील जिल्हाधिकाऱ्यांची यासंदर्भातील मते जाणून घेण्यात आली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाने यासंदर्भातील निर्णय घेतला आहे.

नागपूर महापालिकेत एकूण १४५ वॉर्ड असून प्रभागाची संख्या ७२ आहे. सुधारित पद्धतीने निवडणूक होणार असल्याने तसेच नव्याने प्रभाग रचना केली जाणार असल्याने या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मतदार नोंदणीचे कार्यक्रमही सुरू आहेत. त्यामुळे मतदारांची संख्याही वाढण्याची शक्यता आहे. एका प्रभागात सरासरी ४० ते ६० हजार मतदारांचा एक प्रभाग राहण्याची शक्यता आहे. याचा विचार केला तर एका केंद्रावरील मतदारांच्या संख्येनुसार मतदान केंद्रांची संख्या ठरेल. त्यानुसार प्रशासनाला व्यवस्था करावी लागणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे.