अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत एकमताने निर्णय; राम माधव पुन्हा संघकार्यात

प्रतिनिधी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरकार्यवाहपदी दत्तात्रेय होसबाळे यांची निवड करण्यात आली. २००९ पासून ते संघाचे सहसरकार्यवाह म्हणून जबाबदारी सांभाळत होते. बेंगळूरु येथे आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व मावळते सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या उपस्थितीत होसबाळे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि एकमताने त्यांची निवड करण्यात आली.

याशिवाय गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सक्रिय असलेले राम माधव यांना संघकार्यात परत बोलावण्यात आले आहे. रामलाल यांच्याकडे अखिल भारतीय संपर्क प्रमुख म्हणून तर नागपूरचे सुनील आंबेकर यांच्याकडे अखिल भारतीय प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

कर्नाटकमधील शिमोगा जिल्ह्याच्या सोराबा जिल्ह्यात १९५५ मध्ये जन्मलेले दत्तात्रेय होसबळे लहानपणापासून संघाशी जुळलेले आहेत. त्यांनी इंग्रजी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी १९७२ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय सदस्य म्हणून काम केले. १९७८ मध्ये नागपूर शहर संपर्कप्रमुख म्हणून विद्यार्थी परिषदेचे पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. आणीबाणीत ते तुरुंगात होते. २००९ मध्ये त्यांच्याकडे संघाच्या सरसहकार्यवाहपदाची जबाबदारी आली. संघाच्या विस्तारात त्यांनी मोठी भूमिका बजावली. याशिवाय प्रतिनिधी सभेत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय जनता पक्षात सक्रिय असलेले राम माधव यांच्याकडे पुन्हा संघकार्य सोपविण्यात आले असून त्यांना नव्या कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. अखिल भारतीय सहप्रचारप्रमुख म्हणून अलोक यांच्याकडे जबाबदारी देण्यात  आली.

याशिवाय गणेश शेटे यांच्याकडे विदर्भ प्रांतप्रचारक, परिक्षित जावडे यांच्याकडे सहप्रांत प्रचारक तर प्रसाद माथनकर यांच्याकडे क्रीडाभारतीची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय पश्चिम क्षेत्र कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून क्षेत्र संचालक डॉ. जयंंतीभाई भाडेसिया यांना जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अरुणकुमार तसेच रामदत्त चक्रधर यांची सहसरकार्यवाहपदी निवड झाली आहे.

 

आतापर्यंतचे सरकार्यवाह

१९२९  – बालाजी हुद्दार

१९५०  – प्रभाकर बळवंत उपाख्य भय्याजी दाणी

१९५६ – एकनाथ रानडे

१९६२ –  प्रभाकर बळवंत उपाख्य भय्याजी दाणी

१९६५ – बाळासाहेब देवरस

१९७३ – माधवराव मुळे

१९७९ – रज्जूभय्या

१९८७ – हो. वे. शेषाद्री

२००० – डॉ. मोहन भागवत

२००९ ते २१ – सुरेश उपाख्य भय्याजी जोशी

२०२१  – दत्तात्रेय होसबाळे

सुनील आंबेकर प्रचारप्रमुख

रामलाल यांच्याकडे अखिल भारतीय संपर्कप्रमुख म्हणून तर नागपूरचे सुनील आंबेकर यांच्याकडे अखिल भारतीय प्रचारप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली. यापूर्वी अरुणकुमार यांच्याकडे ही जबाबदारी होती.