महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत व्यस्त असलेल्या विविध राजकीय पक्षांमधील इच्छुक उमेदवारांना हातची कामे सोडून चलन टंचाईतून मार्ग काढण्याच्या कामाला प्राधान्य द्यावे लागत आहे. चलन टंचाईमुळे निवडणूक मोर्चेबांधणी ठप्प झाली आहे.

प्रभाग रचना आणि आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापालिका निवडणूक मोर्चेबांधणीला सर्वच राजकीय पक्षातील इच्छुकांनी सुरुवात केली होती. कार्यकर्त्यांच्या बैठका, जनसंपर्क आदी कामांत ते व्यस्त झाले होते. गेल्या आठवडय़ात अचानक केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीमुळे परिस्थिती पूर्णपणे बदलली. जो तो त्यांच्याकडे असलेल्या जुन्या नोटा बदलण्याच्या प्रयत्नाला लागल्याने इच्छुकांकडे आता कार्यकर्त्यांचीही वानवा आहे. दुसरीकडे कार्यकर्त्यांनाही सांभाळून ठेवण्यासाठी आर्थिक रसद पुरवावी लागते. त्यातही नेत्यांनी काटकसर सुरू केली आहे. प्रत्येक वस्तीत, गल्लीबोळीत सध्या चलन टंचाईचीच चर्चा आहे. निवडणुकींवर किंवा वॉर्डातील समस्येवरही कोणी बोलायला तयार नाही, अशी स्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर लोकसंपर्क करायचा कसा, म्हणून सर्वच इच्छुक सध्या शांत बसले आहेत.

भाजपने केंद्राच्या निर्णयाचे स्वागत केले असून त्यांचा प्रचार आणि प्रसारही सुरू आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या प्रश्नाचा लाभ घेण्यासाठी बँका किंवा एटीएमच्या पुढे रांगेत असणाऱ्या नागरिकांना पाणी आणि चहा वाटपाची मोहीम हाती घेतली आहे. काही निवडकच ठिकाणी हा प्रयोग करण्यात आला आहे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी तर ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात म्हणून योजना सुरू केली असून त्यात युवा मोर्चाचे कार्यकर्ते करीत आहेत. शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील काही बँकासमोर पिण्याची पाण्याची सोय केली असून ज्यांना नोटा बदलण्यासाठी अर्ज भरता येत नाही अशांना ते अर्ज सुद्धा भरून देत आहेत.

काँग्रेसचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी केंद्राच्या निर्णयाचा विरोध करणे सुरू केले आहे. चलन टंचाईच्या मुद्दाला अशा प्रकारे राजकीय वळण देण्याचे प्रकार सुरू आहे. मात्र याचा अपवाद सोडला तर या मुद्दावरून महापालिका निवडणुकीच्या मोर्चेबांधणी संदर्भात कुठल्याच पक्षात विशेष हालचाली सुरूनाहीत. आठ दिवसात परिस्थिती सुरळीत होईल, असा अंदाज सुरुवातीच्या काळात सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना होता. परिस्थिती सामान्य झाल्यानंतर पुन्हा प्रचार-प्रसाराच्या कामाला लागू असे नियोजनही करण्यात आले होते. परंतु आठ दिवस झाले तरी परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस आणखी गंभीर होत चालली असल्याने इच्छुकांनाही शांत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.