जयंत पाटील यांचा कार्यकर्त्यांना सूचना

पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या डिसेंबरमध्ये लोकसभा आणि राज्यात विधानसभा एकत्र घेण्याचा अंदाज घेत आहेत. इतर पक्षाची तयारी नसताना अचानक निवडणुका घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे. तेव्हा जिल्ह्य़ातील मतदार संघ येत्या पाच महिन्यात बांधण्यासाठी कामाला लागा, अशी सूचना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केल्या. पाटील यांनी जिल्ह्यतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी पक्षाच्या गणेशपेठ येथील कार्यालयात शुक्रवारी संवाद साधला. त्यानंतर ते भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकच्या प्रचारासाठी रवाना झाले.

गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपने ‘१ बूथ टेन यूथ’या धर्तीवर पक्षाची बांधणी केली होती. त्यात त्यांना यश मिळाले.

भाजपाच्या यश बघता राष्ट्रवादीनेही बूथ स्तरावर पक्षबांधणीवर भर दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस विदर्भातल्या गावा—गावांत पोहचवण्यासाठी प्रत्येक गावात बूथ कमिटी तयार करा, एखाद्या गावात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नसेल तर त्या गावातील २०-२२ वर्षांंचे   युवक एकत्र करुन त्यांच्याकडे बूथ कमिटीची जबाबदारी सोपवा, असे आदेश आज   पाटील यांनी दिले. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री बसवायचा असेल तर विदर्भाचा कल असणे आवश्यक आहे. ज्या पक्षाकडे विदर्भात अधिक मिळतात, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग सुकर होतो, असा आजवरचा इतिहास आहे.

सरकारने जनतेचा अंत पाहू नये

दररोज वाढत असलेल्या पेट्रोल-डिझलेच्या किंमतीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. आता सरकारने जनतेचा अंत पाहू नये. ताततडीने ही इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस मोठे आंदोलन उभारेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी आकाशवाणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत बैलगाडी मोर्चा काढला. यावेळी ते बोलत होते. मोर्चातील बैलगाडीवर जयंत पाटील,अनिल देशमुख, रमेश बंग स्वार होते. सोबतच एका दुचाकी ठेवण्यात आली होती. सरकारच्या विरोधात घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.